पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीचे निकाल अजूनही स्वीकारू शकलेले नाहीत. या निकालानंतर अतिशय मुश्किलीने एनडीए सरकार बनले, अशा शब्दांत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राच्या संपादकीयमधून मोदींवर जोरदार हल्ला चढवला आहे. मोदींना ना लोकसभेचा निकाल कळलाय ना मतदारांनी दिलेला संदेश त्यांनी गांभीर्याने घेतलाय असेही त्यांनी म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर संसदेच्या पहिल्याच अधिवेशनात नीट आणि विविध मुद्दय़ांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अक्षरशः धूमश्चक्री उडाली. त्यानंतर आता सोनिया गांधी यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.
मोदी संसदेतील एकमताचे महत्त्व सांगतात, परंतु प्रत्यक्षात ते संघर्षाला प्रोत्साहन देतात. संसदेच्या कामकाजावरूनही सोनिया गांधी यांनी एनडीए सरकारवर आसूड ओढला आहे. 18 व्या लोकसभेच्या संसद अधिवेशनाच्या सुरुवातीलाच सरकार आणि विरोधकांमध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळाला. मतभेद इतके टोकाला गेले की कामकाज सुरळीत चालू शकले नाही. सत्ताधारी कुणालाच सोबत घेऊन पुढे जाऊ शकले नाहीत, असेही सोनिया गांधी यांनी म्हटले आहे.
लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यायला हवे होते
परंपरेनुसार लोकसभेचे उपाध्यक्षपद विरोधी पक्षांना दिले गेले पाहिजे होते. त्यासाठी विनंतीही करण्यात आली होती, परंतु ती सरकारने फेटाळून लावली. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात भाजपचा मित्रपक्ष एआयएडीएमकेचे एम थब्मी दुरई यांना लोकसभा उपाध्यक्ष बनवले होते, परंतु 2019 ते 2024 दरम्यान हे पद रिक्त ठेवण्यात आले होते, याकडेही सोनिया गांधी यांनी लक्ष वेधले आहे.
आणीबाणीच्या मुद्दय़ावर बोलताना सोनिया गांधी यांनी संविधानावरील हल्ल्याच्या मुद्दय़ावरून लक्ष इतरत्र वळवण्यासाठीच पंतप्रधानांनी आणीबाणीचा मुद्दा उचलला असा आरोप केला. लोकसभा अध्यक्षांकडून निष्पक्षपणे सभागृह चालवण्याची अपेक्षा होती, परंतु त्यांनीही हा मुद्दा उपस्थित केला, याचे आश्चर्य वाटते असेही सोनिया गांधी यांनी लेखात म्हटले आहे.