महाराष्ट्रात सत्ता बदलणारच; शरद पवार यांचा विश्वास

महाराष्ट्रात लोकसभेला 155 विधानसभा मतदारसंघांत भाजपाचा पराभव झाला आहे. त्या ठिकाणी आमचे उमेदवार पुढे आहेत. याचा अर्थ राज्यातील जनतेने एक इशारा दिला आहे. विधानसभेत अशी स्थिती झाली तर इथे सत्ता बदलणारच आहे. त्यासाठी अनुकूल अशी स्थिती आहे, असे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार म्हणाले.

भाजपच्या या लोकसभेत जागा किती कमी झाल्या याची नोंद घेतली तर कुणाच्या मुक्ततेबाबत बोलण्याचा अधिकार त्यांना नाही. यांच्याकडे बहुमत नाही. चंद्राबाबू आणि नितीशकुमार यांची मदत नसती तर त्यांचे पेंद्रात सरकार आले नसते. लोक मोदींच्या कारभारावर खूश नाहीत. मोदी पुनः पुन्हा सांगत होते की, माझी गॅरंटी आहे. पण ती गॅरंटी काही चाललेली दिसत नाही, अशी टीका शरद पवार यांनी केली.

आणीबाणीचा विषय आता काढण्याची गरज नाही

आणीबाणीच्या विषयाला पन्नास वर्षे झाली. आणीबाणीनंतर इंदिरा गांधी यांनी देशासमोर दिलगीरी व्यक्त केली. त्यामुळे आता तो विषय काढण्याची गरज नाही. लोकसभा अध्यक्षांची जबाबदारी काय? राजकीय प्रश्नावर भाष्य करण्याची. राष्ट्रपतींच्या भाषणातही त्याचा ओझरता उल्लेख होता तो करण्याची आवश्यकता नव्हती, असे शरद पवार म्हणाले.

खिशात 70 रुपये, मग 100 खर्च कसे करणार?

लोकसभेत 48 पैकी 31 जागा ज्या विचाराच्या निवडून येतात. त्यातून लोकांचा कल काय आहे हे स्पष्ट होते. त्यातून जो धसका घेतला, त्यामुळे हा भाषेचा फुलोरा असलेला अर्थसंकल्प मांडला. एखाद्या गोष्टीवर 100 रुपये खर्च करणार आणि खिशात 70 रुपये आहेत, तर मग 100 रुपये खर्च कसे करणार? असा सवाल शरद पवार यांनी केला.

काँग्रेसमुक्त भाषा करणाऱ्या मोदींनी किती जागा घटल्या ते बघावे!

कॉँग्रेसच्या मुक्ततेची भाषा करणाऱ्यांनी आपण कुठे आहोत हे आधी बघायला हवे. गेल्या लोकसभेत त्यांची संख्या किती होती आणि आता किती आहे. मोदींनी त्यांच्या किती जागा घटल्या हे बघावे, असा टोलाही शरद पवार यांनी भाजप नेत्यांना लगावला.