टेम्पोवाल्याच्या मदतीसाठी मोदी चिनी कामगारांना व्हिसा देतील, काँग्रेसचे टिकास्त्र

अदानी समूहाने आपल्या सोलार प्रकल्पासाठी तब्बल आठ चिनी कंपन्यांची मदत घेतल्यावरून काँग्रेसने आज एनडीए सरकारवर हल्ला चढवला. या ठिकाणी राष्ट्रीय सुरक्षेवर विचार होणार आहे का, असा सवाल करतानाच टेम्पोवाल्याच्या मदतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी चिनी कामगारांनाही व्हिसा देण्यासाठी मागेपुढे पाहणार नाहीत, अशा शब्दांत काँग्रेस सरचिटणीस जयराम रमेश यांनी एनडीए सरकारवर निशाणा साधला आहे.

देशातील प्रामाणिकपणे कर भरणाऱया नागरिकांच्या पैशांचा वापर चीनच्या मदतीसाठी करू नये, असे जयराम रमेश यांनी म्हटले आहे. हिंदुस्थानला चीनवर निर्भर राहू देणार नाही, या मोदींच्या धोरणाचीही जयराम रमेश यांनी आठवण करून दिली आहे. नॉन बायोलॉजिक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 19 जून 2020 रोजी गलवान खोऱयात झालेल्या संघर्षानंतर ना कुणी आपल्या सीमेत घुसू शकले, ना कुणी घुसले आहे, असे म्हटले होते, परंतु आता चिनी कामगारांनाही हिंदुस्थानसाठी व्हिसा देण्यासाठी आणि आपल्या टेम्पोवाल्या मित्राला मदत करण्यासाठी मागेपुढे पाहणार नाही, अशी टीका केली.