भाजपची शवपेटी तयार; शेवटचा खिळा आम्ही ठोकू! सोरेन यांचा झटका

झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची पाच महिन्यांनंतर तुरुंगातून सुटका झाली. सुटका होताच त्यांनी भाजपावर जोरदार हल्ला चढवला. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपाला पूर्णपणे साफ करून टाकू, भाजपने माझ्याविरोधात षड्यंत्र रचले, झारखंडची जनता त्यांना कधीच माफ करणार नाही, भाजपच्या शवपेटीचा शेवटचा खिळा आम्ही ठोकू आणि झारखंडमधून भाजपला हद्दपार करू, अशा शब्दांत हेमंत सोरेन यांनी भाजपवर निशाणा साधला.

हेमंत सोरेन यांनी आज आपल्या निवासस्थानी झारखंड मुक्ती मोर्चाच्या कार्यकर्त्यांना संबोधित केले. नीटसह विविध परीक्षांच्या पेपरफुटीबद्दल बोलताना त्यांनी व भाजपाने सर्व वैधानिक संस्थांवर कब्जा केल्याचा आरोप केला. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत झारखंडमधील जनतेने भाजपला धडा शिकवला. कधीही निवडणुका घ्या आता येथील जनताच झारखंडमधून भाजपला हद्दपार करेल, असा विश्वासही सोरेन यांनी व्यक्त केला.

भाजपाचे आदिवासी केवळ रबर स्टॅम्प

भाजपा अनेक राज्यांमध्ये आदिवासींना मुख्यमंत्री बनवत आहे. परंतु, ते सगळे भाजपाचे केवळ रबर स्टॅम्प आहेत. खोटय़ा आरोपाखाली मला तुरुंगात पाठवले, परंतु न्यायालयाने मला न्याय दिला आणि ते राज्याने आणि संपूर्ण देशाने पाहिले. मी त्यांच्या समोर उभाच राहू नये असे षड्यंत्र त्यांनी रचले. पाच महिन्यांत हे राज्य आणखी पुढे गेले असते, असेही हेमंत सोरेन म्हणाले.

मी जर लोकसभा निवडणुकीआधी काही काळ तुरुंगाबाहेर आलो असतो तर भाजपा दिव्याच्या प्रकाशात शोधूनही कुठे दिसला नसता. ‘देवाच्या दरबारात देर है अंधेर नही’ यावर माझा विश्वास होता. सत्य कितीही सिमेंटने लिपू देत, साखळदंडाने जखडून ठेवू देत, ते बाहेर येतेच, अशा शब्दांत हेमंत सोरेन यांनी भाजपावर निशाणा साधला.