पवई येथील भीमनगर परिसरातील झोपडपट्टीवर महापालिकेने केलेल्या कारवाईची चौकशी करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज दिले. पवई येथील भीमनगर परिसरातील झोपडय़ांवरील कारवाईबाबतचा प्रश्न काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी औचित्याच्या मुद्दय़ाद्वारे उपस्थित केला. या ठिकाणी 650 गरीब, मागासवर्गीय कुटुंबांवर 6 जूनच्या रात्री पोलीस बंदोबस्तात कारवाई करून या कुटुंबांना बेघर करण्यात आले आहे. आज ही सर्व कुटुंबं रस्त्यावर आहेत. पोलीस व मुंबई पालिका प्रशासनाच्या माध्यमातून चुकीची कारवाई करून या मागासवर्गीय लोकांना बेघर करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. पोलीस ताफा वापरून मागासवर्गीयांवर अन्याय केला आहे. गर्भवती स्त्रियांना मारले, 14 वर्षांच्या मुलाला मारले. स्वतःला बुलडोझर बाबा म्हणता आणि गरीबावर बुलडोझर चालवता ही हुकूमशाही असल्याचा आरोप करीत याप्रकरणी अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्याची मागणीही वडेट्टीवार यांनी केली. याप्रकरणी कारवाईसाठी विरोधकांनी आक्रमक पवित्रा धारण केला. त्यानंतर या सर्वांची गंभीर दखल घेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी चौकशीचे आदेश दिले.