टीम इंडियाच्या महिला संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या एकमेक कसोटी सामन्यात विक्रमांचा पाऊस पाडला आहे. पहिल्या दिवसातील पहिल्या डावात शफाली वर्मा आणि स्मृती मानधाना यांनी धडाकेबाज फलंदाजी करत विविध विक्रम मोडीत काढले. तोच फॉर्म कायम ठेवत दुसऱ्या दिवशी टीम इंडियाच्या फलंदाजांनी विस्फोटक फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाचा विक्रम मोडीत काढला आणि महिला कसोटी क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या उभारली.
चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर टीम इंडियाच्या महिलांनी एतिहासीक कामगिरी केली आहे. पहिल्या दिवसातील पहिल्या डावात टीम इंडियाची सलामीची जोडी शफाली वर्मा (205 धावा) आणि स्मृती मानधना (149 धावा) यांनी महिला क्रिकेटच्या इतिहासातील पहिल्या विकेटसाठी 292 धावांची सर्वात मोठी भागीदारी करण्याचा विक्रम आपल्या नावे केला. शफाली आणि स्मृती यांच्या योगदानामुळेच टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 575 धावांचा विक्रम मोडीत काढत आपला पहिला डाव 6 बाद 603 या महिला कसोटी क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्येवर घोषित केला.
शफाली आणि स्मृती यांच्याव्यतिरीक्त कर्णधार हरमनप्रीत कौर, जेमिमा आणि ऋचा यांनी अर्धशतके करत सर्वोच्च धावसंख्या उभारण्यासाठी खारीचा वाटा उचलला. तसेच टीम इंडियाने पहिल्या दिवशी चार विकेटच्या मोबदल्यात 525 धावा केल्या होत्या. ही कसोटी क्रिकेटमधील एका दिवसातील सर्वोच्च धावसंख्या आहे. यापुर्वी हा विक्रम श्रीलंकेच्या पुरुष संघाच्या नावावर होता, त्यांनी 2002 साली बांग्लादेशविरुद्ध 509 धावा केल्या होत्या.