>>धनंजय साठे
हल्ली आपण पाहतो की, प्रत्येक गल्लीबोळात जसा टीव्हीवर ओटीटी या व्यासपीठाचा उगम होताना दिसतो तसाच ‘कराओके क्लब्स’ हा एक प्रकार अलीकडे जास्तच सुपरिचित व्हायला लागलेला आहे. होतकरू गायक आणि गायिकांसाठी नवीन आणि पटकन प्रसिद्ध झालेला हा व्यासपीठ आहे. तर मग बघू या, काय आहे हे कराओके माजिक?
‘कराओके’ या शब्दाचा उगम 1967 मध्ये जपानमध्ये झाला. जपानी भाषेत ‘करा’ म्हणजे ‘रिकामं’ आणि दवेदूल्ra म्हणजे आार्केस्ट्रा. म्हणजे थोडक्यात काय तर वादकांविना रिकामा आार्केस्ट्रा! याबद्दल अशी दंतकथा प्रचलित आहे की, जपानमधल्या एका स्नॅक बारमध्ये मुख्य गायक काही कारणामुळे आले नाहीत. कॅफेच्या मालकाने त्याच्याकडे उपलब्ध असलेल्या कराओके मशीन आणि कधी लागतील म्हणून बनवून ठेवलेले गाण्याचे काही ट्रक्स होते. तिथे हजर असलेल्या गिऱहाईकांनी जाऊ नये म्हणून त्यांना आवाहन देत ज्याला गायनाची आवड आहे, त्याने पुढे येऊन त्या ट्रकवर गाणी गाऊन स्वतची आणि उपस्थित मंडळींची करमणूक करावी असे जाहीर केले. तिथूनच कराओकेवर गाणी गायची सुरुवात झाली आणि आज ती दोन अब्ज डॉलर्सची मोठी इंडस्ट्री झाली आहे.
गेल्या काही वर्षांत, विशेषत: 2020 मध्ये कोरोनाचे आगमन झाले त्या वेळी लोक घरी बसून होते. त्या काळात स्टारमेकर, स्म्युलसारख्या अॅप्सचा वापर बघायला मिळाला. जेथे तुम्ही आपलं नाव नोंदवून त्या अॅपद्वारे गाऊ शकता. त्या अॅपमध्ये विविध गाण्यांचे संगीत आधीच तयार असते. गाणं गाऊन झाल्यावर ते सोशल मीडियावर शेअर करण्याची त्यात सोय आहे. लोकांनी कोविड काळात त्याचा मनमुराद आनंद घेतला.
पण जसं लॉकडाऊन संपलं तसं लोक बाहेर पडायला लागले. मग या गायन छंदाचं रूपांतर आधी ग्रुप्स नंतर अशा क्लब्समध्ये होऊ लागलं. आज नगरात, उपनगरात या कराओके क्लब्सचं रूपांतर एका विशाल कुटुंबात झालं आहे. कराओके क्लब्स चालवण्यासाठी जो निधी लागतो तो गायकांकडूनच वसूल केला जातो. कधी एका गाण्याचे 500 रुपये, तर कधी 1200 रूपये पण मोजावे लागतात. संगीत आणि गाण्याची आवड असलेले आपल्या देशात असंख्य आहेत. त्यामुळे आज ऑनलाइन शिकवणंसुद्धा उपलब्ध आहे. सुरूवातीला कराओकेवर गायचं भल्याभल्यांना जमत नाही, पण जसजसा ट्रक्सचा वेग समजायला लागतो आणि ज्यांना सूरतालाची समज आहे अशांचा हळूहळू जम बसू लागतो आणि त्यांचं गाणं श्रवणीय होऊ लागतं.
कराओके ट्राक्सवर पूर्वनियोजित संगीतानुसार गावं लागतं म्हणून ते चाकोरीबद्ध असतं. डय़ुएट असेल तर विशेष लक्ष ठेवावं लागतं. कारण जर पुरुष गायकाचा आवाज ट्रकवर किंचितही मागेपुढे गेला तर त्याचे पडसाद थेट महिला गायिकेच्या ओळींवर उमटतात आणि ओळी वरखाली झाल्याचं लगेच लक्षात येतं. याउलट लाईव्ह ऑर्केस्ट्रामध्ये गायक जरा पुढेमागे गेला तर वाद्यवृंदातले वादक सांभाळून घेतात आणि प्रेक्षकांच्या लक्षात ती चूक येत नाही.
गायनाचा एखादा कार्पाम आयोजित करणं म्हणजे वादकांचं मानधन, सुटसुटीत मंच, ध्वनी संयोजन या व्यवस्था पाहाव्या लागतात. कराओकेवरचे कार्पाम लोकांना घरातही आयोजित करता येऊ शकतात. कारण त्यासाठी फक्त कराओके ट्रक, माईक आणि छानसा स्पीकर असला तरी पुरेसं असतं. एकदा आमचा कराओके गायन संध्येचा कार्पाम होता. त्या संध्याकाळी वीसेक गायक/गायिका होत्या. हॉल प्रेक्षकांनी गच्च भरला होता. आम्हा स्पर्धकांमध्ये एक जोडपं होतं. त्यांनी लता-किशोर यांचं ‘सुनो कहो, कहा सुना’ हे डय़ुएट गाणं निवडलं होतं. प्रश्न-उत्तर असा त्या गाण्याचा बाज होता. पण हे जोडपं ठार बहिरं होतं. मला वाटलं की, कसं जमणार दोघांना! त्यांनी हातात माईक घेतले. गाणं परफेक्ट सुरू झालं आणि थोडय़ाच वेळात दोघांनीही उपस्थितांना अचंबित करून सोडलं. इतके सुंदर गायले. त्यांच्या गाण्याचं आणि दांडग्या उत्साहाचं सर्वांनी कौतुक केलं.
गाण्याचा अजिबात गंध नसलेली मंडळी एवढा आत्मविश्वास कुठून आणतात ते कधी कधी बघण्यासारखं असतं. एकदा एका बाईने तर राग शिवरंजनीवर आधारित लता मंगेशकरांचे ‘मेरे नैना सावन भादो’ या गाण्याचा हट्ट धरला. त्या संध्याकाळी मी एका गोड गाण्याची निर्घृण हत्या होताना पाहिली किंवा ऐकली. काही कराओके आयोजकही यात मागे नसतात. गाण्याची मोडतोड करून काहीतरी भीषण प्रकार करतात आणि वर मला खाणाखुणा करून “कसा छान पकडला ना सूर मी!” असं सांगतात. अशा वेळी मला हसावं की रडावं, कळत नाही.
माझ्या मते सुरुवातीला जरा सोप्या गाण्यांची निवड करावी. कराओके ट्रक तुमच्यासाठी थांबत नाही. शास्त्राrय बाज असलेल्या गाण्यांना तज्ञाचं मार्गदर्शन लागतं. खूप रिहर्सल लागते. तेव्हा कुठे 70 टक्के गाणं जमून जातं, पण काही मंडळींना सांगायला गेलं की, त्यांना ते आवडत नाही. पैसे दिलेत म्हणून कसंही गाऊन हसं करून घ्यायचं? किंवा मला आवडतं म्हणून न जमणारी गाणी गायची? अशा लोकांचं कठीण आहे. गायकांनी चाल, शब्द, लय, गाण्यातले चढउतार, बारकावे समजून उमजून गायलं पाहिजे. गंमत म्हणजे ही मंडळी मलाच गाठून “कसं झालं माझं गाणं” असं विचारतात आणि खोटा अभिनय करताना माझा कस लागतो. पण तरीही येणाऱया काळात अनेक नवीन गायकांना संधी मिळवून देण्याचं काम या कराओके क्लब्समुळे शक्य झालं आहे.
आज मी अभिमानाने सांगू शकतो की, मी पंचवीस हजारांच्या वर गाणी कराओकेवर आणि लाईव्ह आार्केस्ट्रावर गायलो आहे. मी नवोदितांना कराओकेवर गाण्याचं टेक्निक शिकवतो. जे शिकायला उत्सुक आहेत अशांनाच ऑनलाइन गायन शिकवतो. इच्छा असेल तर करा ई-मेलवर संपर्क!
(लेखक क्रिएटिव्ह हेड, अभिनेते आणि गायक आहेत.)