>>संजय मोने
या जगावर केवळ न् केवळ आपलीच मक्तेदारी आहे आणि आपल्याशिवाय हे जग चालणार नाही अशा आर्विभावात असणारी मंडळी आपल्या आजूबाजूला असतात. ‘आपुन बोले तो…’ असं भासवणाऱया अशा मंडळींपैकी एक म्हणजे आमचा अवि! आमच्या शिवाजी पार्क मैदानातील अविभाज्य घटक.
आमच्या शिवाजी पार्क मैदानातला एक अविभाज्य घटक म्हणजे अविनाश. त्याची इतकीच ओळख आहे, जरा जवळीक दाखवण्यासाठी काही लोक त्याला ‘अव्या’ अशीही हाक मारतात. पण त्यामुळे त्याला अजिबात जवळीक वगैरे वाटत नाही. अर्थात त्याला महात्मा, राष्ट्रपिता किंवा स्वातंत्र्यसेनानी अशी हाक मारली तरी तो तितक्याच थंडपणे त्याला प्रतिसाद देईल. त्यामुळेच आडनाव वगैरे इतर गोष्टी आमच्यासाठी आणि मुख्यत त्याच्यासाठी अत्यंत गौण आहेत. तो शिवाजी पार्कच्या इतका जवळ राहतो की त्याला अगदी तलत मेहमूदने आपल्या अतिशय हळुवार आणि मखमली आवाजात पार्कातून हाक मारली तरी त्याला ती ऐकू येईल. अर्थात तो कबूल करणार नाही, कारण तो ‘रफी’वाला आहे. आमचा एक समूह होता. पंधरा जणांचा, सकाळी फिरणाऱया लोकांचा, त्यात मग कालांतराने अजून सातआठ जण येऊन लगडले. बघता बघता मोठं टोळकं झालं. मुळात सुरुवात मी फिरायला जायला लागलो तिथून झाली. जो नंतर काही काळाने आमचा संच किंवा समूह जमला (माफ करा! सध्या त्याला मराठीत ग्रुप म्हणतात) आता अविनाश त्यात कुठून आला? तर एका सोहळ्यात आम्ही भेटलो, तोपर्यंत माझी त्याची ओळख, माझ्या मित्राचा मेहुणा इतकीच होती. मी तारुण्य ओलांडायच्या सीमेवर होतो आणि तो नुकतंच पल्याड जाऊन पोहोचला होता. (पल्याड हा शब्द सामाजिक सलवाल्या लेखकांकडून उधार घेतला आहे. गरज संपली की परत केला जाईल.)
“एवढा बारीक कसा झालास? आजारी होतास?” आजारी असलेला माणूसच बारीक होऊ शकतो असं त्याचं म्हणणं असावं. “मी सकाळी उठून फिरायला जातो, जोरजोरात चांगल्या पाच-सहा फेऱया मारतो. पन्नास मिनिटं.”
“सकाळी? म्हणजे साडेनऊ दहाच्या सुमारास?” अविनाशच्या मेंदूतील घडय़ाळ, सकाळ म्हणजे दहाच्या आसपास इतकंच जागृत होतं. “नाही रे! साडेपाचला किंवा पाच दहा मिनिटं इकडेतिकडे.”
“इतक्या लवकर? किती, पाच-दहा लोक येत असतील ना?” अत्यंत चिंचोळा मेंदू असेल तरच असे प्रश्न निर्माण होतात. “मोजले नाहीत, पण गर्दी असते त्यानंतर तिथे येणाऱया राजकीय, सामाजिक आणि कला क्षेत्रातल्या लोकांची.” मी यादी वाचून काढली. त्यातल्या एकाचं नाव ऐकून अविनाश म्हणाला, “आयला तो येतो? त्याला एकदा भेटायचं आहे.”
“कशासाठी?” अविनाशने खांदे उडवले याचा अर्थ त्याला उत्तर द्यायचं नाहीये हे मागाहून, तो आमच्यात सामील झाल्यावर, कळलं. दुसऱया दिवशी सकाळी अविनाश फिरायला आला. आल्याबरोब्बर त्याने विचारलं, “तो कधी येतो?” मी त्याला “तो” आल्याबरोबर इशारा करून दाखवला. अविनाश कलावंत असल्यामुळे “त्याने” अविनाशला साहजिकच ओळखलं. त्याच्या खांद्यावर हात टाकून दोघे फिरायला निघाले. आमचे उरलेले लोक यायची वाट बघत मी थांबलो. सगळे आल्यावर आम्ही फिरायला लागलो. सगळं झाल्यावर नेहमीप्रमाणे कट्टय़ावर विसावलो. आता प्रथेप्रमाणे गैरहजर असलेल्या व्यक्तीबद्दल अद्वातद्वा बोलायला आम्ही सुरुवात करणार तोच अविनाश आणि ‘तो’ आले. त्याच्या चेहऱयावर अष्टविनायकाची सहल केल्याचे भाव होते. ‘तो’ निघून गेला. “अवि! त्या माणसाकडे काय काम होतं?” मी सहज विचारलं. “मूर्ख आहे तो! मी माझं काम त्याला सांगायच्या आधीच त्याने त्याचं काम पुढे केलं.” “तो”ला चेहऱयाने ओळखणारे आमच्यातले काही होते त्यातल्या एकाला फारच अचंबा वाटला. “ तो काम करतो?”
“का? या जगात सगळ्यांना काम करायचा हक्क आहे ना?” अवि काही बाबतीत फारच जागतिक पातळीवर बोलायचा.
“तुम्हाला काही समस्या आहे?” नुकतीच ओळख झालेल्या माणसाची बोलायची एक सर्वमान्य पद्धत असते ई. ई. गोष्टी त्याच्यासाठी गौण होत्या. मीच त्याला विचारलं
“अवि! काय काम होतं त्याचं?”
“त्याला एकपात्री प्रयोग करायचे आहेत.” अवि उत्तरला
“त्याच्याकडे काय आहे सांगण्यासारखं? काय करतो तो?”
“जकात नाक्यावर कोणीतरी अधिकारी टाईप आहे. मी त्याला सांगितलं करूया की!”
“तो नेमकं काय करतो तुला माहीत नाही, आणि त्याचा एकपात्री प्रयोग तू ठरवणार?”
“का? त्याला लोकांना सांगण्यासारखं असेल ना काहीतरी! तुम्ही लोक नाही, मुलाखती देत?.. आणि काय विचारतात त्यात? या क्षेत्राकडे तुम्ही कधी आणि कसे वळलात? साला कुठे वळलो आपण? सरळ चालत आलो आणि अभिनय करायला लागलो. कलाक्षेत्र म्हणजे काय घाट आहे, ज्यात वळणं असतात? साल्यो तुम्ही गंभीर असल्यासारखा चेहरा करता आणि सांगता. लोक ऐकतात. तसंच आमच्या या चेकनाक्यावरच्या माणसाचं ऐकतील.”
आम्ही सगळ्यांनी त्याला वेडय़ात काढलं. साधारण आठवडय़ानंतर तो सकाळी फिरायला आला. हातात असंख्य वर्तमानपत्रे होती. त्याने ती आमच्यासमोर उलगडली. दरेक ठिकाणी त्या माणसाच्या कार्पामाची परीक्षणं आणि अफाट गर्दीचे फोटोज होते. सगळ्या फोटोत अवि नव्वद टक्के जागा व्यापून होता आणि “तो” कुठेतरी उदबत्तीच्या आकाराएवढा दिसत होता. हळूहळू अविने आमच्या सगळ्या समूहाचा ताबा घेतला. “अवि! एक काम आहे!” एक निवृत्त व्हायच्या वयाच्या आणि मोठय़ा हुद्दय़ावर असलेल्या माणसाने आपल्या समस्येची तिजोरी उघडली. “होऊन जाईल! कधी करुया?”अविने आपण राष्ट्रपती, अगदी राष्ट्रपती नाही पण, निदान उपराष्ट्रपती असल्याच्या थाटात त्याला ग्वाही दिली. “बँकेत आता माझं प्रमोशन होतंय.”
“वा! छान! मग आज सकाळचा चहा आणि बन-मस्का तुमच्याकडून.” अवि उत्साहाने ओरडला.
“म्हणजे समस्या अशी आहे, मला अरुणाचल प्रदेशला पाठवत आहेत.”
“आणि तुम्हाला कुठे हवंय? तिथे जागा बघायला सुरुवात करा!”
“पण अजून कुठे ते मी तुम्हाला सांगितलं नाहीये.”
“आपल्या पृथ्वीच्या बाहेर तर नाहीये ना?” आपल्या विनोदावर तो खदाखदा हसला. विनोद फार बरा नव्हता, पण नंतर बन-मस्का मिळेल या आशेने आम्ही सगळे बदाबदा हसलो. “मला अविसाहेब! कर्नाटकात चालेल.” तो हुद्देदार म्हणाला. “असं नाही चालणार! जागा सांगा.” अविचा जो काही आवेश होता त्याने आम्हीच काय, पण ज्यावर आम्ही बसलो होतो तो कट्टाही गार पडला. “ते म्हणजे… धारवाड किंवा हुबळी… चालेल… बेळगावीसुद्धा.” “कोणाच्या हातात आहे तुमचं प्रमोशन?” सगळी बँक आपल्याकडे सकाळी पाया पडायला येते या आविर्भावात अवि म्हणाला. “बी.वी.के. राव म्हणून आहेत.” “हा हा! ते चष्मा लावतात ते. थोडेसे केस मागे गेलेले… नेहमी सूट आणि टायमध्ये असतात ते?” “अगदी बरोबर!” तो हुद्देदार आत कुठल्याही क्षणी अविच्या पायावर लोळण घ्यायला तयार होता. “घरी जाऊन फोन करतो त्यांना. होऊन जाईल काम! पण माझं ऐकाल तर तुम्ही आत्ता अरुणाचल प्रदेशला जाऊन रुजू व्हा! आपण महिन्या-दोन महिन्यात तुम्हाला उचलूया तिथून.” आम्ही सगळे वेडे व्हायच्या मार्गावर होतो. तो हुद्देदार गेल्यावर आम्ही अविवर हल्ला केला. “कसं करणार त्याचं काम? तू त्या रावला ओळखतोस?” “नाही!” निर्विकारपणे अवि म्हणाला. “मग त्याचं वर्णन कसं केलंस?”
“सोपं आहे. सगळ्या वरिष्ठ लोकांचं वर्णन सारखंच असतं.”
“आणि तुझं वर्णन त्याने नाकारलं असतं तर?”
“अच्छा असा नाही का दिसत? मग तो दुसरा असेल! असं सांगायचं.”
“त्याची ट्रान्स्फर नाही झाली तर?”
“आपण प्रयत्न केला असं सांगायचं. बाकी सोडा! आपल्याला अरुणाचल प्रदेशात एक हक्काचं घर झालं नाही का?” असं म्हणून अवि शांतपणे आपल्या स्कूटरला किक मारून चालता झाला.