>> तरंग वैद्य
‘पुलवामा’ची न विसरता येणारी, आजही डोळय़ांत अश्रू आणणारी दुर्दैवी घटना. आपल्या गुप्तचर संघटनांनी या हल्ल्यामागे कोण आणि कुठे आहे याचा शोध घेतला आणि हवाई हल्ल्याद्वारे पाकव्याप्त कश्मीर येथील बालाकोटमध्ये असलेला त्यांचा तळ नेस्तनाबूत केला. या हल्ल्याची पूर्वतयारी ते पुढे आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटणाऱया पडसादांना सामोरे जाण्याची तयारी यासाठी आखलेली रणनीती दर्शविणारी ‘रणनीती’ ही वेब सीरिज.
‘रणनीती’ युद्धात वापरला जाणारा शब्द. युद्ध लढायला जाताना केलेली पूर्वतयारी म्हणजे रणनीती. जसजशी परिस्थिती बदलते, सेनापती त्यानुसार आपली रणनीती बदलतो किंवा नव्याने आखतो. ‘पुलवामा’ची न विसरता येणारी, डोळय़ांत आजही अश्रू आणणारी दुर्दैवी घटना. आपल्या गुप्तचर संघटनांनी या हल्ल्यामागे कोण आणि कुठे आहे याचा शोध घेतला. त्यांचा नेमका पत्ता काढला आणि हवाई हल्ल्याद्वारे पाकव्याप्त कश्मीर येथील बालाकोटमध्ये असलेला त्यांचा तळ नेस्तनाबूत केला. या हल्ल्याची पूर्वतयारी ते पुढे आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटणाऱया पडसादांना कसे सामोरे जायचे याची जी तयारी केली गेली म्हणजेच जी रणनीती आखली गेली त्याचे दृकश्राव्य वर्णन म्हणजे जिओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 25 एप्रिल 2024 ला आलेली ‘रणनीती’ या नावाची वेब सीरिज. अनेक बारीक तपशिलांसह ही मालिका आपल्या ज्ञानात भर पाडतेच, आपले मनोरंजनही करते, पण त्याचबरोबर प्रेक्षकांचा सैनिकांसाठी, आपल्या संरक्षण विभागासाठी असलेला आदर अनेक पटीने वाढविते.
युद्ध हे पुरातन काळापासून सुरू आहे. पूर्वीचे राजे आपल्या राज्याची सीमा वाढवण्यासाठी, आपली शक्ती दाखवण्यासाठी युद्ध करायचे. आज नकाशावरील आपल्या देशाच्या रेषा पसरवण्यासाठी, शक्ती प्रदर्शनासाठी किंवा अहंकारापायी जगात सर्वत्र युद्धाचे सावट आहे. शक्तिशाली राष्टे^ इतर राष्ट्रांना आपल्या मुठीत ठेवण्याकरिता युद्धाचे भय दाखवत असतात किंवा तशी परिस्थिती निर्माण करीत असतात. युद्धाकडे बघण्याचा एक व्यावसायिक दृष्टिकोन म्हणजे व्यापार वाढवणे. मोठी राष्टे^ मोठय़ा प्रमाणात हत्यार, बॉम्ब, युद्धबोट, लढाऊ विमाने बनवतात. त्यांच्या पीसाठीही युद्धे घडवली जातात हे दुर्दैवी सत्य आहे. हिंदुस्थान-पाकिस्तानमध्ये ही दोन्ही राष्ट्रे स्वतंत्र झाली तेव्हापासूनच तेढ आहे. या पूर्वी शेजारील राष्ट्र आपल्या देशात दहशतवाद्यांच्या माध्यमातून बॉम्बस्फोट घडवायचा आणि आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याची पार करून गप्प बसायचो, पण ‘पुलवामा’नंतर आपण असे ऐतिहासिक पाऊल उचलले की, आता कोणी आपल्यावर भ्याड हल्ला करायच्या आधी शंभर वेळा विचार करेल.
बालाकोट हल्ल्यानंतर शेजारील राष्ट्राकडून सूड घ्यायचा प्रयत्न, तो यशस्वीरीत्या हाणून पाडताना आपल्या एका सैनिकाचे बंदिस्त होणे, त्याला सोडवून आणण्याचे सार्थक प्रयत्नसुद्धा या मालिकेत दाखवले आहेत. सध्याचे युद्ध नुसते रणभूमीचे नसून त्यात सोशल मीडिया म्हणजेच ट्विटर, व्हॉट्सआप, हॅश टॅग यांचाही मोलाचा सहभाग असतो हे परिणामकारकरीत्या दाखवले आहे. खरे काय घडलेय पेक्षा काय दाखवले जातेय यावर लोकांचा विश्वास पटकन बसतो. कारण सोशल मीडिया आज इतका बलशाली आहे की, दोन्ही राष्ट्रे याचा पुरेपूर वापर करतात. हे बघताना आजची युद्धे कशाप्रकारे लढली जातात याची कल्पना येते आणि वर लिहिल्याप्रमाणे आपल्या ज्ञानात भर पडते.
आशिष विद्यार्थी, जिमी शेरगिल, लारा दत्ता हिंदुस्थानकडून रणनीती आखणारे मुख्य कलाकार, तर आशुतोष राणा पाकिस्तानसाठी रणनीती आखतात. राणा उत्तम अभिनेते आहेत हे त्यांनी परत एकदा सिद्ध केले आहे. जिमीच्या वाटय़ाला सततच दुःखी, तणावग्रस्त भूमिका येत आहेत. त्यांनी त्यांची भूमिका चांगली निभावली आहे, पण पुढे त्यांचा हसरा चेहरा बघायलाही आवडेल. आशिष विद्यार्थी अभिनयात गुरू आहेत हे वेगळय़ाने सांगायला नको. लारा दत्ता आपल्या भूमिकेत चपखल बसली आहे. मोहित चौहानने देशाच्या पंतप्रधानांची भूमिका बरी निभावली आहे. इतर कलाकारांनी पण आपल्या भूमिकेला न्याय दिला आहे.
या मालिकेतील वैशिष्टय़ म्हणजे यात शेजारील राष्ट्रातील सैन्य अधिकाऱयांनाही तितकेच हुशार, विचार करणारे दाखवले आहे. कारण या पूर्वी बघितलेल्या सिनेमा, मालिकांमध्ये आपण नेहमीच त्यांना कमी बुद्धीचे, काहीसे बावळट दाखवत आलो आहोत. खरे तर दोन्ही पक्ष जेव्हा तुल्यबळ असतात तेव्हा युद्ध रंगते आणि जिंकल्यावर एक वेगळाच आनंदही मिळतो. या मालिकेचा हाच उजवा पक्ष आहे. दोन्ही राष्ट्रांचे ‘चाणक्य’ आपापली रणनीती आखत कथा पुढे नेतात आणि 40 मिनिटांचे नऊ भाग कधी संपतात हे कळतच नाहीत.
अशा प्रकारच्या मालिका बघताना आपला देश किती चांगला आहे याची जाणीव होत राहते. आपल्या सैनिकांबद्दल, गुप्तचर संस्थांबद्दल जो आदर आहे तो आणखीन वाढतो. आजच्या घडीला युद्ध जिंकायचे असेल तर प्रसारमाध्यमातून खेळले जाणारे युद्धही तेवढेच महत्त्वाचे कसे आहे हे दाखवणारी ही मालिका जरूर पहा असे नमूद करू इच्छितो.
इथे आणखीन एक सांगावेसे वाटते, युद्ध कुठल्याही पद्धतीचे असो, वाईटच. आज जगाची अवस्था काय आहे हे वेगळय़ाने सांगायला नकोच. सर्वत्र अस्थिरता आहे, मानसिक अशांती आहे आणि सतत बॉम्बस्फोट, क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे जे उष्मेचे प्रमाण वाढत आहे ते सगळेच अनुभवत आहेत. त्यामुळे आता तरी जगांनी युद्ध सोडून ‘वसुधैव कुटुंबकम’चा मंत्र अमलात आणला पाहिजे.
(लेखक सिनेदिग्दर्शक व पटकथाकार आहेत)