>> अस्मिता येंडे
जीवनप्रवासात वेगवेगळ्या विचारसरणीच्या, स्वभावाच्या व्यक्ती आपल्याला विविध कारणांनी भेटत असतात. असे म्हणतात, कोणत्या ना कोणत्या उद्देशाने या व्यक्ती ठरावीक काळासाठी जीवनात येतात आणि बरेच काही शिकवूनही जातात, पण त्यातील वैशिष्टय़पूर्ण व्यक्तिमत्त्व आपल्या मनावर त्यांची छाप पाडून जातात.
प्रा. दीपक कुळकर्णी हे खरे तर टेक्सटाईल इंजिनियर पण व्यवसायाने प्राध्यापक, हाडाचे शिक्षक. त्यांनी ‘जिवाभावाचे पाहुणे’ या ललित लेखसंग्रहात ज्या व्यक्तींनी आपल्या कार्यकुशलतेने, प्रेरणेने लेखकाचे अंतरंग प्रभावित केले आहे, आपल्या छोटय़ाशा कृतीतून जगण्याचे वेगळे तत्त्व मांडले, अशा प्रेरणादायी व्यक्तींच्या सोबतचे विविध किस्से वा प्रसंग संस्मरणीय करण्याचा प्रयत्न या ललितबंधातून केलेला आहे. शीर्षक अत्यंत समर्पक आहे.
संग्रहात एकूण 38 लेख समाविष्ट असून प्रत्येक लेखातून आपल्या कार्याने इतरांना प्रेरित करणार्या व्यक्तिमत्त्वांचे व्यक्तिचित्रणच लेखकाने शब्दात रेखाटले आहे. साधी- सरळ निवेदनशैली, ओघवती आणि प्रवाही भाषा, मुद्देसूद लेखरचना तसेच डोळ्यांसमोर चित्र निर्माण करणारी आशयगर्भ लेखणी यामुळे हा ललित लेखसंग्रह स्व-कोशातून बाहेर पडून जीवनाकडे व्यापकपणे पाहत वैचारिक क्षमता निर्माण करणारा आहे. अनेकांगी व्यक्तिमत्त्वांची गाथा या पुस्तकातून अनुभवायला मिळते. सोबतच लेखकाने अत्यंत महत्त्वाची गोष्ट अधोरेखित केली आहे,
पुस्तकातील ललितलेख वाचताना सातत्याने जाणवते ते म्हणजे, आजही आपल्या माजी विद्यार्थ्यांशी असलेला सुसंवाद, आपुलकीचे ऋणानुबंध आणि विविध ठिकाणी होण्राया भेटीगाठी. स्नेहबंध जपण्याचे किती साधे- सुंदर निकष या पुस्तकातून मांडले आहेत. सदर पुस्तक वाचताना हे ‘जिवाभावाचे पाहुणे’ वाचकांनाही कधी आपलेसे करतात. नक्की अनुभवा, जिवलगांचा प्रेरित करणारा स्नेहप्रवास !
जिवाभावाचे पाहुणे
लेखक ः दीपक कुळकर्णी
प्रकाशक ः संवेदना प्रकाशन, पुणे n मूल्य ः 180 रुपये