>> रविप्रकाश कुलकर्णी
वयाची शंभरी गाठणं ही सहजसोपी गोष्ट नाही. म्हणूनच तर शंभरीचा माणूस पाहणं हीदेखील भाग्याची गोष्ट. हे कशाला शंभर वर्षे झालेल्या किती जणांची नावं तरी आपल्याला माहीत असतील का? धोंडो केशव कर्वे, संस्कृत विद्वान म.अ. मेहेंदळे, क्रिकेटवीर दि. ब. देवधर, अचाट प्रयोग करणारे बाबुराव गोखले. स्मरणशक्तीला ताण दिला तर आणखी दोनेक जण आठवतील, की मग संपलं…
अशा पार्श्वभूमीवर लेखक भानू काळे आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते शिक्षक दिलीप फलटणकर यांनी सांगितलं की, 21 जून 2024 ही तारीख मोकळी ठेवा. त्या दिवशी यास्मिन शेख या शंभराव्या वर्षात पदार्पण करत आहेत हे निमित्त करून पुण्यात त्यांचा सत्कार होत आहे. अर्थात मग अशा दुर्लभ घटनेला साक्षीदार होण्याचा भाग्ययोग कोण कशाला सोडेल? प्राध्यापक यास्मिन शेख या मराठी भाषेच्या आस्थेवाईक अभ्यासक आहेत. शिवाय ‘मराठी शब्दलेखन कोश’, ‘मराठी लेखन मार्गदर्शिका’ ही त्यांची दोन पुस्तकं लेखनविषयक मान्य नियमानुसार अचूक लेखन करण्यासाठी संदर्भ ग्रंथच आहेत. मराठी भाषा तज्ञ आणि मराठी व्याकरण सल्लागार असा त्यांचा लौकिक सर्वमान्य आहे. यासाठी त्यांना 2017 मध्ये महाराष्ट्र सरकारचा डॉ. अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार देण्यात आला.
मूळच्या त्या जेरुशा जॉन रुबेन. बेने इस्रायली म्हणजे बहुतेक जण म्हणतात त्याप्रमाणे ज्यू धर्माच्या. त्यांचा विवाह झाला तो अजीज अहमद इब्राहिम शेख उपाख्य डॅडी शेख या मुस्लिमाशी, जे नाशिकच्या चित्रमंदिर या सिनेमा थिएटरमध्ये कामाला होते. त्यासाठी पुढाकार घेतला होता तो नाटककार वसंत कानेटकर यांनी. एरवी ज्यू आणि मुसलमान संबंध म्हणजे विळा-भोपळ्याचं सख्य, जे आजही आपण जागतिक राजकारणाच्या पटावर पदोपदी पाहत आहोत. लग्नानंतर जेरुशाचं नाव यास्मिन झालं. ते कसं तर डॅडी शेखांच्या आईला ‘जेरुशा’ हे नाव उच्चारता येईना म्हणून नामांतर झालं यास्मिन. मात्र जेरुशाचं धर्मांतर झालं नाही. त्यांना दोन मुली. मोठी शमा आणि धाकटी रुकसाना. ज्या लग्नानंतर अनुक्रमे शमा भागवत, रुमा बावीकर झाल्या.
आता थोडं त्यांच्या भाषाविषयक कार्याबद्दल. प्राध्यापक म्हणून काम करताना त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये मराठीबाबत किती सजग राहिलं पाहिजे ही जाण निर्माण केली हे सांगणारे त्यांचे अनेक उच्चपदस्थ विद्यार्थी आज विविध क्षेत्रांत दिसतात. तसंच नागरी सेवा (यूपीएससी) स्पर्धा परीक्षेत त्यांनी उमेदवार विद्यार्थ्यांना मराठीबाबत जे सहजसोपं मार्गदर्शन करून या विषयाबाबतची भीती दूर केली हे त्यांचे कार्य संस्मरणीय आहे. सध्याचे आयुक्त, मुंबई महानगरपालिका, भूषण गगराणी यांनी म्हटलं आहे, “व्याकरणासारखा अत्यंत निरस आणि शुष्क विषय म्हणजे ओढवून घेतलेलं संकट वाटायचं, परंतु मॅडमनी व्याकरण इतकं सहजसोपं आणि काही प्रमाणात मनोरंजक केलं की, त्याबद्दलची अनास्था तर दूर झालीच, पण या सर्वामागचा कार्यकारणभाव कायमस्वरूपी रुजला गेला.’’
यास्मिन शेख यांनी ‘अंतर्नाद’ मासिकासंदर्भात जी कामगिरी केली ती संस्मरणीय आहे. संपादक भानू काळे यांनी प्रत्येक अंकाच्या पहिल्या पानावर श्रेयनामावलीत ‘व्याकरण सल्लागार’ म्हणून त्यांचं नाव आवर्जून छापलं. ‘अंतर्नाद’मध्ये त्यांनी विविध प्रकारचं लेखन केलं. त्यात भाषाविषयक लेख आहेतच, पण ‘शेख आडनाव आणि मी’सारखे आत्मपर लेख पण आहेत. त्यात ‘श्री.पु. भागवत ः सहकारी आणि स्नेही’ हा लेख म्हणजे श्रीपुंच्या व्यक्तिमत्त्वावर टाकलेला प्रकाश आहे. त्यांचं असंच उल्लेखनीय लेखन म्हणजे ‘लोकसत्ता’मध्ये ‘भाषासूत्र’ सदरात केलेली टिपणं.
तर अशा यास्मिन शेख यांच्या वाढदिवसाला मी न जाऊन कसं चालेल असं वाटून मी त्या ओढीने गेलो. या समारंभाला शेखबाईंना शुभेच्छा देण्यासाठी दूरवरून त्यांचे विद्यार्थी, आप्तेष्ट आणि स्नेही आलेले होते. समारंभाप्रसंगी भानू काळे आणि दिलीप फलटणकर यांनी संपादित केलेले ‘यास्मिन शेख-मूर्तिमंत मराठी प्रेम’ हा गौरवग्रंथ प्रकाशित झाला.
सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे यास्मिन शेख यांच्या उत्साहात वार्धक्याचा लवलेशही जाणवत नव्हता. भाषणात त्या म्हणाल्या, ‘रिकामे मधुघट’ या कवितेत भा.रा. तांबे म्हणतात, “संध्याछाया भिवविती हृदया’… त्यात थोडा बदल करून मी ‘संध्याछाया सुखविती हृदया…’ असं म्हणू शकते ते या सकारात्मक दृष्टिकोनामुळेच.’’ हाच विचार शेखबाइं&नी त्यांच्या 90 व्या वाढदिवसाला सांगितला होता. म्हणजे 90 ते 100 हा पल्ला त्यांनी सहजतेने गाठला होता. पुढची वाटचालदेखील तेवढय़ाच दमदारपणे त्या करतील याची ग्वाही त्यांच्या वागण्याबोलण्यात दिसत होती.