पश्चिमरंग- डान्स ऑफ दि नाइट्स

>> दुष्यंत पाटील

जगभरातल्या अनेक महान संगीतकारांनी विसावं शतक आपल्या कल्पक रचनांनी गाजवलं. या शतकात रशियातले तीन महान संगीतकार संगीतक्षेत्रात झळकले. हे तीन संगीतकार होते स्ट्रविन्स्की, शोस्ताकोविच आणि प्रोकोफिएव्ह. प्रोकोफिएव्हची बॅलेमधील डान्स ऑफ दि नाइट्सनावाची एक संगीतरचना आजही तितकीच अजरामर आहे.

 

विसाव्या शतकातलं संगीत आधीच्या शतकातल्या संगीतापेक्षा खूप वेगळं होतं. विशिष्ट पट्टीतले स्वर वापरत संगीत रचण्याची पारंपरिक पद्धत विसाव्या शतकात मागे पडली. जगभरातल्या अनेक महान संगीतकारांनी विसावं शतक आपल्या कल्पक रचनांनी गाजवलं. या शतकात रशियातले तीन महान संगीतकार संगीतक्षेत्रात झळकले. हे तीन संगीतकार होते स्ट्रविन्स्की, शोस्ताकोविच आणि प्रोकोफिएव्ह. तिघांनाही आपापल्या संगीतरचनांबद्दल लोकांकडून अनेक मानसन्मान मिळाले. तिघांचंही संगीत सर्जनशील, नावीन्यपूर्ण होतं. त्यांचं संगीत जगभर आवडीने ऐकलं जायचं, त्यांनी संगीत दिलेले बॅलेज जगभर आवडीने पाहिले जायचे.

या तिन्ही संगीतकारांना एका कठीण कालखंडातून जावं लागलं. हा कठीण कालखंड म्हणजे स्टॅलिनच्या कारकिर्दीचा काळ. स्टॅलिन सत्तेवर आल्यानंतर कलाकार मंडळींवर प्रचंड बंधनं यायला लागली. स्टॅलिनच्या कारकिर्दीपूर्वी
स्ट्रविन्स्की, शोस्ताकोविच आणि प्रोकोफिएव्ह यांनी संगीतरचना करण्यासाठीचे स्वातंत्र्य अनुभवलं होतं. त्यांच्या संगीतरचना साऱया रशियाभर आवडीने ऐकल्या जायच्या. महत्त्वाचं म्हणजे, या तिघांच्या संगीतरचनांचं सरकारी अधिकाऱयांकडूनही कौतुक व्हायचं. वेगवेगळे पुरस्कारही मिळायचे. एकूणच रशियामध्ये कला आणि संगीत यासाठी स्टॅलिन सत्तेत येण्यापूर्वी सुवर्णकाळ होता.

स्टॅलिनच्या कारकिर्दीचं वैशिष्टय़ म्हणजे, त्याची असणारी रशियामधली दहशत. एखाद्या व्यक्तीकडून आपल्या सत्तेला धोका आहे असा संशय आला तरीही
स्टॅलिन त्या व्यक्तीचा काटा काढायचा. स्टॅलिनला विरोध करणाऱयांची बहुतेक वेळा तुरुंगात रवानगी व्हायची. काही वेळेला त्यांना आपले प्राणही गमवावे लागत.
स्टॅलिनला विरोध करणाऱया मंडळांना किंवा समित्यांना बरखास्त केलं जायचं. हे सारं सरळ सरळ दिसत असूनही आपण आपले विचार मुक्तपणे मांडू शकतो, आपल्याला
स्टॅलिनपासून कसलाही धोका नाही अशा गैरसमजात संगीतकार शोस्ताकोविच होता.

एखाद्या सच्च्या कलाकाराप्रमाणे शोस्ताकोविच स्वतच्या प्रतिभेने, कसलंही  दडपण  न घेता मुक्तपणे संगीतरचना करायचा. 1930च्या दशकात
स्टॅलिनने रशियन बॅलेज, सिम्फनीज असे संगीताचे कार्यक्रम स्वत जाऊन ऐकायला सुरुवात केली.
नाटय़दिग्दर्शक, संगीतकार स्टॅलिनला काय आवडेल याचा विचार करत आपली कला सादर करत होते.

शोस्ताकोविचचा एक बॅले पाहण्यासाठी स्टॅलिनने हजेरी लावली. शोस्ताकोविच मोठय़ा कल्पकतेने या बॅलेला थोडंसं वेगळय़ा प्रकारचं संगीत दिलं होतं. स्टॅलिन येणार म्हणून त्याने आपल्या संगीतात कसलाही बदल केला नव्हता. स्टॅलिन
बॅले पाहू लागला तसं शोस्ताकोविचने रचलेलं संगीत त्याच्या डोक्यावरून जाऊ लागलं. त्याला हा बॅले न आवडल्याने  तो बॅलेच्या तिसऱया अंकापूर्वीच निघून गेला. हे सारं पाहून शोस्ताकोविच चिंतेत पडला.

रशियाच्या ‘प्रावदा’ या राष्ट्रीय वृत्तपत्रात शोस्ताकोविचच्या संगीतावर जहरी टीका करण्यात आली. ‘संगीताऐवजी गोंधळ’ अशा मथळय़ाखाली त्याच्या बॅलेच्या संगीतावर लेख छापून आला. त्याला साऱया सांस्कृतिक मंडळांमधून काढून टाकण्यात आलं. त्याने संगीत दिलेले बॅलेज सादर करायचं आता कुणाचंच धाडस नव्हतं. संगीतक्षेत्रातल्या, कलाक्षेत्रातल्या मोठमोठय़ा लोकांनी त्याच्याशी संबंध तोडायला सुरुवात केली.
शोस्ताकोविचच्या प्रकरणाकडे बारकाईने लक्ष ठेवणाऱयांपैकी एक होता संगीतकार प्रोकोफिएव्ह.

प्रोकोफिएव्हनं ‘रोमिओ अँड ज्युलिएट’ नावाच्या
बॅलेला संगीत दिलं होतं. हे संगीत पारंपरिक संगीतापेक्षा थोडं वेगळय़ा प्रकारचं होतं. शोस्ताकोविचचं प्रकरण पाहता हा
बॅले सादर करायला नाटय़गृह तयारच होत नव्हतं. देशात काय चाललंय हे प्रोकोफिएव्हलाही कळत होतं. प्रोकोफिएव्हने आपल्या संगीतात बदल करताना कलेचा दर्जा कमी होणार नाही याची पूर्ण काळजी घेतली. या बॅलेमध्ये ‘डान्स ऑफ दि नाईट्स’ नावाची एक संगीतरचना होती. ‘रोमिओ अँड ज्युलिएट’मधले परस्परांशी वैर असणारे कुटुंबीय सुरुवातीला समोरासमोर येतात तेव्हा हे संगीत येतं. भविष्यात होणाऱया संघर्षाची कल्पना देणारी ही संगीतरचना प्रचंड गाजली. प्रोकोफिएव्हच्या अजरामर झालेल्या संगीतरचनांपैकी ही एक.

‘डान्स ऑफ दि नाइट्स’ आजपर्यंत कित्येक चित्रपटांमध्ये आणि टीव्हीवरच्या कार्यक्रमांमध्ये वापरण्यात आलं आहे. बऱयाचदा फुटबॉलच्या सामन्यांआधी हे संगीत वाजवलं जातं. या संगीताची लोकप्रियता आजही कमी झालेली नाही. हे संगीत (Dance of the knights) आपण यु-टय़ूबवर जाऊन एकदा तरी ऐकायलाच हवं !

z [email protected]