>> अनिल हर्डीकर
महंमद रफी यांना के. एल. सैगल यांच्या प्रोत्साहनामुळे लाहोर रेडिओवर गायची संधी मिळाली. त्यांच्या झालेल्या पहिल्या नाटय़पूर्ण भेटीत रफींना लाभलेला सैगल यांचा आशीर्वाद खरा ठरला. ही भेट रफींना ओळख देणारी ठरली.
महंमद रफीला जाऊन येत्या 31 जुलैला 44 वर्षे होतील. इतक्या वर्षांनंतरदेखील रफीच्या आवाजाची मोहिनी संगीत रसिकांवर अजूनही राज्य करते आहे. तो गायक म्हणून तर श्रेष्ठ होताच, पण एक माणूस म्हणूनदेखील तो गुणी होता. ज्या श्रीकांत ठाकरे यांनी महंमद रफी याच्याकडून अनेक मराठी गाणी गाऊन घेतली ते म्हणत, “रफीच्या गायकीबद्दल अनेकांत मतभेद होतील, पण एक माणूस म्हणून त्याचा विचार करायचा झाला तर मात्र कोणाचेही त्याच्याविषयी दुमत होणार नाही, कारण रफी हा काही साधा माणूस नव्हता, तर तो देवमाणूस होता.’’
रफीचं वैशिष्टय़ हे होते की, कोणीही नवा संगीतकार त्याच्याकडे आला की, तो त्याला कधीच विन्मुख करून परत पाठवायचा नाही. उलट त्याच्याशी अदबीने वागायचा. अदबच माणसाला यश मिळवून देत असते असे त्याला वाटत असे.
अन्नू मलिक हा जुने आणि जाणते संगीतकार सरदार मलिक यांचा पुत्र. तो ज्या वेळी संगीतकार म्हणून रफीकडे आला त्या वेळी रफी म्हणाला, “मी किती भाग्यवान आहे! तुमच्या पित्याकडे मी गाणं गायलंय, आज तुमच्याकडेही गातोय.’’ संगीतकारांच्या दोन पिढय़ा रफींनी (तशा अनेक) पाहिल्या. रोशनकडे रफी गायला तसा तो राजेश रोशनकडे गायला. एस. डी. बर्मनकडे गायला तसा आर. डी. बर्मनकडे गायला. अनेक संगीतकारांची कारकीर्द रफीने गायलेल्या गाण्याने सुरू झाली होती. शंकर-जयकिशन, मदन मोहन, रवी, कल्याणजी-आनंदजी, उषा खन्ना, लक्ष्मीकांत-प्यारेलाल, आर. डी. बर्मन, सोनिक ओमी, रवींद्र जैन, राजेश रोशन… किती नावे घ्यायची?
कैक संगीतकारांना त्यांच्या आयुष्याच्या अखेरच्या काळात रफीने आर्थिक मदत केली आहे, त्याविषयी एकाही शब्दाने उच्चार न करता. असे म्हणतात, दरमहा अशा मदतीचा आकडा काही हजारांत होता. चाळीस वर्षांपूर्वी अशा माणसाला देवमाणूस म्हणायचे की देवदूत?
रफी हा कमालीचा धार्मिक माणूस होता. त्यामुळे फकिराची गाणी म्हणताना त्याच्या मनात भक्तिभाव निर्माण व्हायचा आणि या भक्तिभावामागे होता त्याच्यावर झालेले फकिरी संस्कार. आज पाकिस्तानात असलेले सुल्तानपूर हे त्याचे जन्मगाव. 24 डिसेंबर 1924चा त्याचा जन्म. तेथे लहानाचा मोठा होत असताना एक़फकीर त्याच्या दाराशी खैरात मागायला यायचा. तो गायचा. त्या फकिराचे गाणे ऐकून रफीमध्ये गाण्याची आवड निर्माण झाली.
रफीचे मोठे बंधू हमीदभाई यांनी त्या काळातील थोर गायकांकडून शास्त्राrय संगीताचे रीतसर शिक्षण घेतले. यथावकाश लाहोर रेडिओवर त्यांना गायची संधी मिळाली. त्यांची गाणी ऐकून प्रभावित झालेल्या संगीतकार श्यामसुंदर यांनी त्याला सर्वप्रथम चित्रपटात गायची संधी दिली. त्या चित्रपटाचे नाव होते ‘गुलबलोच!’ हा चित्रपट पंजाबी भाषेत होता आणि गाण्याचे शब्द होते ‘सोणिये नो हीरिये नी तेरी याद ने सताया…’ चित्रपट संगीतात त्याने गायलेले हे पहिले गाणे.
आजच्या लेखात मी तुम्हाला सांगणार आहे, रफीला ज्या के. एल. सैगल यांच्या प्रोत्साहनामुळे लाहोर रेडिओवर गायची संधी मिळाली, त्यांच्या झालेल्या पहिल्या नाटय़पूर्ण भेटीची. 1938-39 सालातली ही गोष्ट. रफी तेव्हा अवघा चौदा वर्षांचा होता. 1935 साली प्रकाशित झालेल्या ‘देवदास’नंतर सैगलच्या लोकप्रियतेचा जमाना नुकताच सुरू झाला होता. त्याच्या गायकीने सर्वांनाच झपाटलेपण आणले होते. अनेक शहरांतून त्याच्या गाण्यांचे कार्यक्रम आयोजित केले जात होते. लाहोरला एका संगीत संमेलनात त्याचा कार्यक्रम आयोजिलेला होता. चाहत्यांनी गर्दी केली होती. रफी केवळ एक चाहता, श्रोता म्हणून त्या कार्यक्रमाला हजर होता.
सैगल रंगमंचावर आला तेव्हा रसिक श्रोत्यांनी टाळय़ांचा कडकडाट केला. पण त्याने जेव्हा गायला सुरुवात केली तेव्हा मात्र त्याच्या पदरी निराशा पडली. कारण माईकची व्यवस्था काही तांत्रिक बिघाडामुळे फेल झाली होती. त्यामुळे सैगलचा आवाज श्रोत्यांना ऐकूच येत नव्हता. श्रोत्यांनी ओरडायला सुरुवात केली. सैगलला गाणे थांबवावे लागले. संयोजकांनी माईक दुरुस्त होईपर्यंत टाइमपास म्हणून रफीला गाण्यासाठी रंगमंचावर बोलावले. रफी माईकशिवाय गायला. त्याचे गाणे माईक नसतानादेखील शेवटच्या श्रोत्यांपर्यंत व्यवस्थित ऐकू गेले. श्रोते शांत झाले. चौदा वर्षांच्या रफीच्या आवाजाची कमाल पाहून सैगलदेखील थक्क झाला आणि श्रोत्यांतून रंगमंचावर येऊन रफीला मिठी मारत त्याला आशीर्वाद दिला, “मुला, एके दिवशी तू हिंदुस्थानचा एक महान गायक होशील.’’
सैगलचा तो आशीर्वाद खरा ठरला. पुढे चित्रपट संगीतात आल्यावर रफीच्या पिढीतील कुणालाही न लाभलेले सैगल यांच्याबरोबर गाण्याचे भाग्य त्याला लाभले. नौशादजींच्या संगीत दिग्दर्शनात ‘शहाजहाँ’मधील ‘मेरे सपनों की रानी, रुही रुही रुही’ हे ते गाणे. ‘तुम मुझे यूं भुला ना पाओगे, जब कभी भी सुनोगे गीत मेरे, संग संग तुम भी गुनगुनाओगे…’ हा रफीच्या गाण्यातला विश्वास रास्त ठरला.