मागोवा- आम्ही चेन्नईकर

>> आशा कबरे-मटाले

चेन्नईत स्थायिक झालेली, महाराष्ट्राशी नातं टिकवून ठेवलेली अनेक मराठी कुटुंबं इथे आहेत. महाराष्ट्रापासून दूर राहून ही मंडळी मराठी सांस्कृतिक ठेवा टिकवण्यासाठी अधिक प्रयत्नशील दिसतात. चेन्नईतल्या मराठी समाजाचा घेतलेला मागोवा.

वैयक्तिक कामासाठी जवळपास महिनाभर चेन्नईमध्ये वास्तव्य झालं, भटकंतीही झाली. इथल्या पाँडी बझारकडे जाताना वडाच्या झाडाभोवती रंगीबेरंगी सिल्क साडय़ा नेसलेल्या बायकांचा घोळका दिसला. तामीळ स्त्रियाही वटपौर्णिमेला वडाची पूजा करतात याचं आश्चर्य वाटल्याने फोटो काढायला जवळ गेले, तर त्या मराठीत बोलताना आढळल्या. मराठी पर्यटकांचा ग्रुप असावा असं वाटून चौकशी केली तर म्हणाल्या, आम्ही इथल्याच.टीनगरमध्येच राहतो. इतक्या मराठी स्त्रिया चेन्नईत! मग कळलं, त्यांची कुटुंबं इथे अनेक वर्षे वास्तव्यास आहेत. 50-55 च्या काही जणी इथेच तामीळ शाळेत शिकलेल्या. कुटुंबीय ‘बिझनेस’ करणारे अशी उत्तरं मिळाली. मराठी माणसाला बिझनेस जमत नाही ही आपली महाराष्ट्रातली धारणा. पण इथे इतक्या दूर कितीतरी मराठी मंडळी अनेक वर्षं व्यवसाय करत इथलीच होऊन राहिलेली दिसली.

तामीळनाडूतल्या ‘तंजावर’चं महाराष्ट्राशी असलेलं नातं ठाऊक होतं. सर्फोजीराजे भोसले यांचं सांस्कृतिक क्षेत्रातलं भरीव योगदानही माहीत होतं. दाक्षिणात्य संगीत व भरतनाटय़मला नवसंजीवनी देण्याची त्यांची कामगिरी ठाऊक होती. तंजावरमध्ये मूळची मराठी असलेली असंख्य कुटुंबं आहेत याचीही कल्पना होती. पण इथे चेन्नईतही अनेक भेटतील हे अनपेक्षित होतं. शोध घेताच ‘महाराष्ट्र मंडळ चेन्नई’ वेबसाईट, फोन नंबर सापडले. यातलाच एक क्रमांक 89 वर्षांच्या इंदुमती फडके यांचा होता. 1956 साली लग्नानंतर तेव्हाच्या ‘मद्रास’ला येऊन स्थायिक झालेल्या इंदुमती फडके यांचं माहेर माटुंग्यातलं. सख्खा धाकटा भाऊ वासू परांजपे क्रिकेटर तर रुईयातल्या विद्यार्थीप्रिय प्राध्यापिका ललिता परांजपे वहिनी. इंदुमती यांचे पती राम फडके यांचा जन्म मद्रासमधलाच. त्यांनी अय्यर, अय्यंगार अशा दोघा पार्टनर्ससोबत ऑफिस इक्विपमेंट कंपनी इथे स्थापन केली. इंदुमती गेली 68 वर्षं चेन्नईमध्ये आहेत. पती महाराष्ट्र मंडळाचे ट्रस्टी होते व त्या स्वतःही. त्यांच्यामार्फत मंडळाच्या ज्येष्ठ माजी पदाधिकारी 90 वर्षांच्या स्नेहलता दातार यांच्याशीही संपर्क झाला. एलफिन्स्टन कॉलेजमधून इंग्रजी व सायकॉलॉजीत पदवी घेतलेल्या स्नेहलता दातार 1961 मध्ये पती व दोन लहानग्या मुलांसह इथे आलेल्या. मर्चंट नेव्हीत नोकरी करणाऱया त्यांच्या पतींनी चेन्नईत ‘एरिक्सन अँड रिचर्ड्स’ कंपनीची फ्रँचायझी घेतली. चेन्नईतील मराठी समाजातील बदलांचा मोठा पट स्नेहलता दातारांनी पाहिलेला आहे.  मंडळाच्या सध्याच्या पदाधिकाऱयांपैकी एक आर्किटेक्ट रश्मी यादव पुढच्या पिढीतल्या. 30-35 वर्षांपूर्वी लग्नानंतर महाराष्ट्रातून चेन्नईला गेलेल्या. त्यांचे सासरे 1958-59 च्या सुमारास चेन्नईत आले तेव्हा शहरातले प्रमुख आर्किटेक्ट मराठीच होते. त्या सांगतात, चितळे, यादव, खर्चे ही ती प्रमुख आर्किटेक्ट मंडळी. यापैकी चितळे पितापुत्रांचं नाव दक्षिण हिंदुस्थानातील आर्किटेक्चरसंदर्भात मानाने घेतलं जातं. रत्नागिरीत जन्मलेले लक्ष्मण महादेव चितळे (1892-1960) देशातील महत्त्वाच्या इमारतींचे आर्किटेक्ट होते.

सासऱयांनी इथे आर्किटेक्चरचा व्यवसाय सुरू केला तेव्हा इथे सगळ्यांची स्वतंत्र घरंच होती. इमारतींमधील घरांची सुरुवात माझ्या सासऱयांनीच केली. रश्मी यादव सांगतात, त्यांचे पती प्रसाद यादवही आर्किटेक्ट आहेत. माझ्या पिढीतल्या सगळ्या सुना महाराष्ट्रातून इथे येऊन 30-35 वर्षं चेन्नईत आहेत. आमचे सगळ्यांचे नवरे आणि मुलंही इथंच जन्मलेली. त्यांना तामीळ उत्तम येतंच. इथे राहायचं म्हणजे तामीळ शिकायलाच हवं या भावनेने तामीळ शिकलो. पण आमची मुलं उत्तम मराठीही बोलतात. रश्मी अभिमानाने सांगतात, आम्ही मराठी माध्यमातून शिकलेल्या असल्याने मराठी साहित्य, संस्कृती मुलांपर्यंतही पोहोचवली. आमची मुलं कुठल्याशा कार्यक्रमासाठी महाराष्ट्रात गेली तर त्यांनी तिथे पोवाडा सादर केला. पण महाराष्ट्रातल्या मराठी मुलांनाच पोवाडा ठाऊक नव्हता. तिथली मराठी मुलं हिंदी चित्रपटांची गाणी गात होती. रश्मी यादव यांच्या म्हणण्यात तथ्य आहे हे आपण जाणतोच. महाराष्ट्रापासून दूर अन्य राज्यांत, परदेशांत राहणारी मंडळी मराठी सांस्कृतिक ठेवा टिकवण्यासाठी अधिक प्रयत्नशील दिसतात. चेन्नईच्या मंडळातही गेली 45-50 वर्षं संतस्मरण, दिंडी आदी उपक्रम चालतात.

मंडळाचे व्यवस्थापक पुण्याहून चेन्नईला स्थायिक झालेले, व्यवसायाने सीए असलेले समर बापट सांगतात, तंजावरमधील मराठी तर लाखांनी असून तामीळनाडूभर पसरलेले आहेत. अनेक पिढय़ा तामीळनाडूमध्ये राहिल्याने ते एव्हाना तामीळच झाले आहेत. त्यांच्या तुलनेत अलीकडच्या काळात 1950 पासून चेन्नईत स्थायिक झालेली कुटुंबं महाराष्ट्राशी नातं टिकवून आहेत. यात 50 च्या दशकात वा आधीच्या काळात इथल्या सोन्याचांदीच्या दागिन्यांच्या कामांत गुंतलेली सांगली, साताऱयाकडची अनेक कुटुंबं आहेत. या मंडळींची संख्या साडेतीन हजारांइतकी सहजच असावी. ‘सावकारपेट’ असा भाग इथे आहे. स्नेहलता दातार यांच्या मते हाताने दागिने घडवणारी काही कुटुंबं बहुधा शिवाजी महाराजांच्या काळापासून इथे असावीत. चांदी-सोनं गाळण्यातील कुशलतेमुळेच ती इथे स्थिरावली आहेत. या मंडळींचं ‘महाराष्ट्र मित्र मंडळ’ही इथे आहे. अन्य एक ‘मराठा असोसिएशन’ही आहे.

अलीकडच्या काळात ‘महाराष्ट्र मंडळ, चेन्नई’च्या कार्यक्रमांतला सहभाग काहीसा ओसरताना आजी-माजी पदाधिकाऱयांना जाणवतो आहे. मराठी कार्यक्रमांसाठी आता इथले मराठी ‘महाराष्ट्र मंडळा’वर अवलंबून नाहीत. मराठी चॅनल्सवर त्यांना कार्यक्रम पाहता येतात. पण टीव्हीवरील कार्यक्रम एकतर्फी असतात. मंडळात भेटीगाठी होतात हे लक्षात घेतलं जात नाही, रश्मी सांगतात. एकेकाळी इथे सुहासिनी मुळगावकरांनी नाटक सादर केली आहेत. देशभरातील बडे सरकारी अधिकारी, यशवंतराव चव्हाण, शरद पवार, विलासराव देशमुख यांसारखी नेतेमंडळी इथे आल्यावर भेटत असत. आजच्या राजकीय नेतेमंडळींमध्ये या सुसंस्कृतपणाचा अभाव दिसतो, दातार नमूद करतात.

1960 च्या दशकात महाराष्ट्र मंडळाची सभासद संख्या 350 च्या आसपास होती. आता ती 100 पेक्षा कमी आहे. इथला मराठी समाज वाढला आहे, पण मंडळात येण्याचा, स्वयंसेवकाचे काम करण्याचा उत्साह दिसत नाही. मराठी माणसांच्या मंडळांचे निरनिराळे गणपती आता इथे बसतात. गेली दहा वर्षं आयटी क्षेत्रातील येणारे-जाणारे मराठी, आयआयटी, एसआरएमसारख्या शैक्षणिक संस्थांमधील मराठी प्राध्यापक-विद्यार्थी इथे आहेतच. तामीळ मजूर मिळत नाहीत म्हणून मराठवाडय़ातून मजूरही येतात.

संत एकनाथांच्या मुलीचं सासरही दक्षिण हिंदुस्थानातलं होतं. यातूनच महाराष्ट्राचं या प्रदेशाशी किती जुनं नातं आहे हे लक्षात यावं, दातार सांगतात.

[email protected]