मिंधे सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे लबाडाघरचे निमंत्रण आहे, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मिंधे सरकारला थोबडवले. शेतकरी आणि संपूर्ण महाराष्ट्रातील जनता आता विधानसभेच्या निवडणुकीची वाट पाहतेय, असे नमूद करत उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्पातील फसवेगिरीवर हल्ला चढवला.
विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाचे कामकाज संपल्यानंतर विधान भवन परिसरात उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यांच्यासोबत शिवसेना नेते, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हेसुद्धा होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्पावर जोरदार टीका केली. शेतकऱ्यांना वीज बिल माफ करण्याची मागणी शिवसेनेने केली होती, ती मान्य झाली, परंतु शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची मागणी सरकारने मान्य केली नाही, असे सांगतानाच, वीज बिल माफ केले मग वीज बिलाची थकबाकी माफ करणार आहात की नाही, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला. एका बाजूने शेतकऱ्यांना लुटण्याचे काम चालू आहे, तर दुसरीकडे मलमपट्टी करण्याचे काम सरकार करत असल्याबद्दलही त्यांनी संताप व्यक्त केला. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर बियाणे, खते, औषधे यावरचा जीएसटी कमी करण्याचा निर्णय आम्ही घेणार असल्याची आठवणही उद्धव ठाकरे यांनी करून दिला.
मिंधे सरकारच्या अर्थमंत्र्यांनी आज मांडलेला अतिरिक्त अर्थसंकल्प म्हणजे आश्वासनांची अतिवृष्टी आणि थापांचा महापूर आहे, हा अर्थसंकल्प नव्हे तर गाजरसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. सगळय़ाच घटकांना आपल्यासोबत जोडण्याचा सरकारचा खोटा प्रयत्न असून देवेंद्र फडणवीसांच्या भाषेत हे खोटं नरेटिव्ह आहे, असेही ते म्हणाले. मिंधे सरकारने आजपर्यंत केलेल्या घोषणांपैकी किती पूर्ण झाल्या यावर तज्ञांची समिती नेमून विधानसभा निवडणुकीच्या आधी त्यावर श्वेतपत्रिका जाहीर करावी, अशी मागणीही त्यांनी केली. अर्थसंकल्पात योजना जाहीर केल्या, परंतु त्यासाठी आर्थिक तरतूद कुठेही दिसत नाही, याकडे त्यांनी माध्यमांचे लक्ष वेधले. लोकांना गाजर दाखवून, त्यांना फसवून आपले इप्सित साध्य करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असे ते म्हणाले.
गेल्या दहा वर्षांमध्ये भारतीय जनता पार्टीने जनतेला खोटी आश्वासने दिली. त्यांच्या खोटय़ा आश्वासनांना आणि थापांना पंटाळून महाराष्ट्रातील जनतेने भाजपासह त्यांच्या मित्रपक्षांना लोकसभा निवडणुकीत दणका दिला. या दणक्याने आता त्यांचे डोळे किलकिले झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला फसवण्यासाठी हे लोक नव्या आश्वासनांचा पाऊस पाडत आहेत. मात्र महाराष्ट्रातील जनता यांच्या थापांवर विश्वास ठेवणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
वारकऱ्यांना विकत घेण्याचा प्रयत्न
वारकऱ्यांच्या प्रत्येक दिंडीला 20 हजार रुपये देण्याची घोषणा सरकारने केली. त्यावरूनही उद्धव ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधला. वारकऱ्यांना पैशांचे काही घेणेदेणे नाही. ते केवळ विठुरायाच्या नावाखाली वारी करतात, मात्र त्यांनाही विकत घेण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे ते म्हणाले.
मुलगा-मुलगी असा भेदभाव करू नका
महिलांना मतदानात आपल्या बाजूने करून घेण्याचा केविलवाणा प्रयत्न या अर्थसंकल्पातून करण्यात आला असल्याची टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली. महिलांसाठी ‘लाडकी लेक’ आणि ‘लाडकी बहीण’ या योजना आणत असाल तर जरूर आणा. पण मुलगा आणि मुलगी असा भेदभाव करू नका. मुलींसाठी काही आणत असाल तर मुलांसाठीदेखील आणा. त्याबद्दल अर्थसंकल्पात कुठेही वाच्यता नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. राज्यात लाखो तरुण बेरोजगार आहेत, नोकरीसाठी वणवण करत आहेत, मात्र रोजगार वाढीसाठी काहीही उपाययोजना या अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या नाहीत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
‘लाडकी बहीण’ योजनेचे स्वागत करतो. घराणेशाहीविरुद्ध बोलणारे लेकीचीही काळजी घेऊ लागले. पण स्वतःच्या लेकीची काळजी घेताय तशी जनतेच्या लेकांची, मुलांचीही काळजी घ्यावी, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी देवेंद्र फडणवीस यांना लगावला.
धूळफेक बंद करा, महाराष्ट्र जागा झालाय
उद्धव ठाकरे म्हणाले की, आर्थिक विकासाच्या बाबतीत महाराष्ट्र गुजरातच्या मागे राहिल्याची गोष्ट इथल्या जनतेला माहिती आहे. सरकारने जनतेला फसवण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्र ओरबाडून गुजरातला नेण्याचे षड्यंत्र रचले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता आता सजग झाली आहे. म्हणूनच अशा अर्थसंकल्पांद्वारे काहीतरी धूळफेक करायची, जनतेला फसवायचे, रेटून खोटे बोलायचे आणि पुन्हा सरकार आणून महाराष्ट्राला लुबाडायचे हे आता चालणार नाही. महाराष्ट्र आता जागा झाला आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सरकारला ठणकावले.