सेमीफायनलची रणधुमाळी सुरू झाली आहे. वेस्ट इंडिजमध्ये खेळवण्यात आलेल्या पहिल्या सेमी फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानचा पराभव करत अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला आहे. दुसरा सेमी फायनल सामना इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये होणार आहे. परंतु या सामन्यावर पावसाचे सावट असून हा सामना रद्द होण्याची शक्यता आहे. असे असले तरी या सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही.
टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये दुसरा सेमी फायनल सामना हिंदुस्थानच्या वेळेनुसार संध्याकाळी 8 वाजता सुरू होणार आहे. परंतु या सामन्यादरम्यान पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असे असले तरी आयसीसीने (ICC) या महत्वपूर्ण सामन्यासाठी राखीव दिवस ठेवलेला नाही. या एवजी 250 मिनिटे म्हणजेच 4 तास 10 मिनिटांचा अतिरिक्त वेळ सामन्यासाठी राखून ठेवला आहे. परंतु या वेळेमध्ये सुद्धा सामना होऊ शकला नाही, तर हा सामना रद्द करण्यात येणार आहे. या सामन्यासाठी राखीव दिवस न ठेवण्यामागचे कारण आयसीसीने जाहिर केले आहे. आयसीसीच्या एका प्रवक्त्याने या संदर्भात भाष्य केले, “दुसऱ्या सेमीफायनलसाठी अतिरिक्त वेळ (4 तास 10 मिनिटे) देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, कारण हा सामना सकाळी 10.30 वाजता (वेस्ट इंडिजच्या वेळेनुसार) सुरू होईल. पहिल्या सेमी फायनलची वेळ आदल्या दिवशी संध्याकाळची आहे. त्यामुळे दोन्ही सामने एकाच दिवशी अतिरिक्त वेळेत खेळवणे शक्य होणार नाही.” असे आयसीसीच्या प्रवक्त्याने म्हंटले आहे.
आजचा सामना रद्द झाला, तर ग्रुप स्टेजमध्ये अव्वल स्थान मिळवणाऱ्या संघाला याचा फायदा होणार असून तो संघ थेट अंतिम फेरीत प्रवेश करणार आहे. टीम इंडिया सुपर 8 मधील त्यांच्या ग्रुपमध्ये पहिल्या क्रमांकावर होती. तर दुसरिकडे इंग्लंडचा संघा त्यांच्या ग्रुपमध्ये दुसऱ्या क्रमांकावर होता. त्यामुळे सामना रद्द झाला तर टीम इंडिया थेट अंतिम फेरीत प्रवेश करणार आहे.