लोकसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष ओम बिर्ला यांनी बुधवारी (26 जून 2024) आणीबाणीचा निषेध करणारा प्रस्ताव वाचला. यावेळी त्यांनी आणीबाणीचा तीव्र शब्दात निषेध केला. आणि हा देशाच्या इतिहासातील काळा अध्याय असल्याचे म्हटले होते. आता काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी लोकसभा अध्यक्षांच्या आणीबाणीच्या प्रस्तावावर नाराजी व्यक्त केली. असे राजकीय प्रस्ताव टाळले पाहिजेत, असे राहुल गांधी म्हणाले.
लोकसभा अध्यक्षांच्या आणीबाणीच्या निषेधाच्या प्रस्तावावर राहुल गांधी यांनी नाराजी व्यक्त केली. लोकसभा अध्यक्षांनी राजकीय प्रस्ताव आणायला नको होता आणि तो टाळायला हवा होता, असे म्हटले. ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांसह राहुल गांधी यांनी आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. ही एक शिष्टाचार भेट होती आणि कालच प्रस्तावित करण्यात आली होती. पण आणीबाणीच्या प्रस्तावार विरोधी पक्ष नाराज होते. आजच्या भेटीत राहुल गांधी यांनी आणीबाणीच्या प्रस्तावावर लोकसभा अध्यक्षांकडे आपली नाराजी व्यक्त केली, अशी माहिती सूत्रांनी दिली.
लोकसभा अध्यक्षांनी हा मुद्दा (आणीबाणी) कशा प्रकारे मांडला हे आपल्या सर्वांसाठीच आश्चर्यजनक आहे. सरकारने जाणीवपूर्वक आजची निवड केली. सभागृहात आज चांगले वातावरण होते, आज लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक होती, भाजप आणि केंद्र सरकार ते वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत होते, अशी टीका काँग्रेस सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी बुधवारी केली होती.