कोपरगावात 84 इमारती धोकादायक; नगरपालिकेकडून इमारत मालकांना नोटीसा

सध्या पावसाळा सुरु असल्याने दुर्घटना घडल्यास जीवितहानी टळावी म्हणून कोपरगाव नगरपंचायतीने धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली आहे. या यादीत 84 इमारतींचा समावेश असून, सर्व इमारत मालकांना नगरपालिकेने नोटिसा धाडल्या आहेत. तसेच ज्‍यांची घरे कमकुवत झाली असतील, त्‍यांनी घरांची डागडुजी करून घ्यावी. नदी, नाल्याकडे असणारी अतिक्रमणे काढून घ्यावीत, धोकादायक घरांबाबत सक्षम प्राधिकरणाकडून स्थलदर्शक तपासणी करून घेण्याचेही आवाहन नगरपालिकेने केले आहे.

मान्सून पूर्व आपत्ती व्यवस्थापनांतर्गत नगरपालिकेच्या नगर रचना विभागाच्या वतीने केलेल्या सर्व्हेमधून ही माहिती समोर आली आहे. मॉन्सूनपूर्व कालावधीत वाहणारे जोरदार वारे तसेच पावसाळ्यात धोकादायक घरे, इमारती कोसळून जीवित व वित्तहानी होऊ नये यासाठी येथील नगरपालिकेने शहरातील ८४ इमारत मालकांना नोटिसा बजावल्‍या आहेत.

घरांचा कोणताही भाग धोकादायक स्थितीत, पडावयास झालेला असल्यास तो भाग त्वरित नगरपालिकेच्या रीतसर पूर्वपरवानगीने काढून टाकावा. जुन्या इमारतीची योग्य त्या सक्षम प्राधिकरणाकडून स्थलदर्शक तपासणी करून त्या प्राधिकरणाकडून सुचविलेल्या दुरुस्त्या कराव्यात. जुने बांधकाम पाडून नवीन बांधकाम करावयाचे झाल्यास तसे नगरपालिकेकडून रीतसर परवानगी घेऊन बांधकाम करावे. परवानाधारक यांचे मार्फत इमारतीचे रचनात्मक स्थैर्य प्रमाणपत्र घेवून नगरपरिषद कार्यालयात रितसर अर्ज करुन सादर करावे, असे नोटिशीत म्हटले आहे.

घरातील तसेच अन्य रहिवाशांच्या जीविताचे रक्षण करावे. मोडकळीस आलेली इमारत असल्यास रस्त्याने येणाऱ्या – जाणाऱ्या नागरिकांच्या जीवितास कोणताही धोका पोहोचणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी केले आहे.