मनमाड-दौंड मार्गावरुन धावणाऱ्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. या मार्गावरील दुहेरीकरण व प्री नॉनइंटरलॉकींग कामासाठी 28 जूनपर्यंत रेल्वेब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरील अनेक रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही ट्रेनच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. या दुहेरी रेल्वेमार्गामुळे क्रॉसिंगसाठी लागणारा तीस मिनीटांचा अवधी कमी होणार आहे.
दौंड मनमाड या रेल्वेमार्गाचे दुहेरीकरणाचे काम डिसेंबर 2024 पर्यंत पुर्ण होईल. या मार्गावरून दररोज 28 रेल्वेगाड्या धावत असून सुमारे 70 हजार प्रवासी रोज प्रवास करतात. पुढील गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबईहून शिर्डीकडे व शिर्डीकडून मुंबईला जाणाऱ्या साईनगर शिर्डी व वंदे भारत एक्सप्रेस (29 व 30 जून), दादरहून साईनगर शिर्डीला व शिर्डीकडून दादरला जाणारी साईनगर साप्ताहिक सुपरफास्ट (28 व 29 जून), त्याप्रमाणे त्रि साप्ताहिक सुपरफास्ट (29 व 30 जून), दादर साईनगर शिर्डी पुणेमार्गे (29 जून) व साईनगर शिर्डी दादर (30 जून) या रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
पुढील गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. 27 ते 29 व 27 ते 30 जूनपर्यंत पुणे-नांदेड व नांदेड-पुणे एक्सप्रेस कुरूडवाडी, लातुर, परळी परभणीमार्गे धावेल, 27 व 28 जून रोजी जम्मुतावी-पुणे (झेलम एक्सप्रेस) मनमाड कोपरगांव नगर दौंड ऐवजी इगतपुरी कल्याण, पनवेलमार्गे पुण्याला जाईल, 28 व 29 जून रोजीची हजरत निजामुददीन वास्को गोवा एक्सप्रेस मनमाड-कोपरगांव-नगर-दौंड ऐवजी इगतपुरी कल्याण पनवेलमार्गे धावेल, 27 ते 28 जून रोजी पुणे-अमरावती हुतात्मा एक्सप्रेस तिच्या निर्धारीत वेळेपेक्षा 90 मिनीटांनी उशीरा पुणे स्थानकातून सुटेल. हडपसर गुवाहटी विशेष रेल्वे 27 जुन रोजी निर्धारीत वेळेपेक्षा अडीच तास उशारी हडपसर रेल्वेस्थानकातून सुटणार आहे. कोरोना काळानंतर रेल्वेचा हा या मार्गावरील सर्वात मोठा ब्लॉक आहे. त्यामुळे ज्या रेल्वेप्रवाशांनी अगोदरचं बुकींग केले होते, त्यांना अन्य खाजगी वाहनांचा पर्याय शोधावा लागणार असून त्यासाठी आता दामदुप्पट पैसे मोजावे लागणार आहेत.