राज्यातील मिंधे व भाजप सरकार ’50 खोक्या’ च्या जोरावर सत्तेवर आल्यापासून हजारो शेतकरी अद्यापपर्यंत कर्जमाफीपासून वंचित आहेत. सेनगाव तालुक्यातील ताकतोडा येथील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळत नसल्यामुळे मागील चार दिवसांपासून शेतकरी आमरण उपोषण करत आहेत. या उपोषणाची मिंधे सरकारकडून अद्यापपर्यंत कोणतीही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या एका शेतकऱ्याने गुरुवारी सकाळी आपली दुचाकी जाळून मिंधे सरकारच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी केली.
हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील ताकतोडा हे गाव 2019 मध्ये कर्जमाफी न मिळाल्यामुळे ग्रामस्थांनी चक्क विक्रीसाठी काढले होते. त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या 54 हजार कोटींच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला होता. त्यामुळे ताकतोडा येथील शेतकऱ्यांना एक प्रकारचा मोठा दिलासा मिळाला होता. मात्र, मिंधे व भाजप सरकारने ’50 खोक्या’ च्या जोरावर महाविकास आघाडीचे चांगले सरकार पाडले.
राज्यासह हिंगोली जिल्ह्यातील हजारो शेतकरी कर्जमाफीच्या प्रतिक्षेत असताना सरकारकडून शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे कर्जमाफी करण्यात यावी, यासाठी सेनगाव तालुक्यातील ताकतोडा येथे गजानन कावरखे, नामदेव पतंगे, संदीप मानमोठे, शांतीराम सावके, के.के.सावके यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी सोमवारपासून उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला तीन दिवस उलटूनही ना प्रशासन ना सरकारकडून कोणत्याही प्रकारची अद्यापपर्यंत दखल घेण्यात आली नाही. उपोषणाच्या चौथ्या दिवशी नामदेव पतंगे या शेतकऱ्याची तब्येत खालावली असल्यामुळे संतप्त झालेल्या शांतीराम सावके या शेतकऱ्याने गुरुवारी सकाळी टाकतोडा येथे आपली दुचाकी जाळून मिंधे सरकारचा तीव्र निषेध व्यक्त केला. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी मिळणे सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत कर्जमाफीचा लाभ मिळाला पाहिजे अशा घोषणा दिल्या.
सरकारला शेतकऱ्यांचे काही देणे घेणे नाही – नामदेव पतंगे
मागील अडीच, तीन वर्षांपासून मराठवाड्यासह हिंगोली जिल्ह्यात दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असताना सरकारकडून अद्यापपर्यंत कर्जमाफी करण्यात आली नाही. कर्जामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. कर्जमाफीसाठी आम्ही अनेक शेतकरी आमरण उपोषण करत असताना ना प्रशासन ना सरकारकडून अद्यापपर्यंत कोणतीही दखल घेण्यात आली नसल्याची खंत तब्येत खालावलेले शेतकरी नामदेव पतंगे यांनी दैनिक ‘सामना’शी बोलताना व्यक्त केली.