आठवी पास भाजपच्या माजी आमदाराने केले पदवीधर मतदारसंघात मतदान? नरेंद्र मेहतांनी स्वत: शेअर केला फोटो

मीरा भाईंदरचे भाजपचे आठवी पास असलेले माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी कोकण पदवीधर मतदारसंघात मतदान केल्याचे समोर आले आहे. नरेंद्र मेहता यांनी बोटाला शाई लावलेला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांच्या या फोटोमुळे आता पुन्हा एकदा भाजपची मतदान केंद्रावरची काळाकांडी समोर आली आहे.

नरेंद्र मेहता यांनी त्यांच्या निवडणूकीच्या प्रतिज्ञा पत्रात ते आठवी पास असल्याचे लिहले होते. बुधवारी पार पडलेल्या पदवीधर मतदारसंघात नरेंद्र मेहता यांनी त्यांच्या पत्नीसह मतदान केल्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोत ते शाई लावलेलं बोट दाखवताना दिसत आहेत. त्यांच्या या फोटोवर प्रतिक्रीया देताना नेटकऱ्यांनी आठवी पास व्यक्ती पदवीधर मतदारसंघात कशी काय मतदान करू शकते असा सवाल केला आहे.

दरम्यान मेहता यांनी याबाबत स्पष्टीकरण देताना आपण मतदान केले नसून फक्त पत्नीसोबत फोटो काढल्याचे म्हटले आहे. ”माझ्या पत्नीने याठिकाणी मतदान केले आहे. मी तिच्यासोबत तिथे गेलो होतो. त्यावेळी फोटोग्राफर्सने आम्हाला फोटोसाठी विनंती केली. त्यामुळे आम्ही दोघांनी पोझ दिली. मात्र मी मतदान केल्याचे कुठेही म्हटलेले नाही’, असे मेहता म्हणाले. मात्र नेटकऱ्यांनी मतदान केले नाही तर बोटाला शाई कशी असा सवाल त्यांना केला आहे.