घटस्फोटीत पत्नीने दुसरा विवाह केला म्हणून पहिला पती संतापला, मग भरवस्तीत थेट गोळीबार केला; हल्ल्यात एक जण जखमी

नगरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घटस्फोटीत पत्नीने दुसरा विवाह केला म्हणून संतापलेल्या पहिल्या पतीने गोळीबार केल्याची घटना पाथर्डी तालुक्यातील हत्राळ येथे घडली आहे. हत्राळ येथील केदार वस्तीवर रात्री साडे आठच्या सुमारास ही घटना घडली. या गोळीबारात एक जण जखमी झाला आहे. जखमीला नगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. माणिक सुखदेव केदार असे जखमी व्यक्तीचे नाव आहे.

घटनेची माहिती मिळताच पाथर्डी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला. याप्रकरणी आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सुभाष विष्णु बडे असे आरोपीचे नाव आहे.

काय आहे प्रकरण?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुभाष बडे आणि त्याच्या पत्नीचा आठ वर्षापूर्वी विवाह झाला होता. मात्र काही कारणाने दोघांचा घटस्फोट झाला. यानंतर महिलेने हाताला येथील तरुणाशी दुसरा विवाह केला. पत्नीने दुसरा विवाह केल्याने सुभाष संतापला. यानंतर सुभाष याने बुधवारी रात्री केदार वस्तीवर जाऊन सशस्त्र हल्ला केला. पोलीस प्रकरणचा सखोल तपास करत आहेत.