इचलकरंजीत गटारीत पडून चिमुकल्याचा मृत्यू

घरात खेळत खेळत उंबरठा ओलांडून गटारीत पडल्याने 11 महिन्यांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शहरानजीकच्या चंदुर गावात घडली. शौर्य सतीश पुजारी असे मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे.

चंदुर येथील महासिद्ध मंदिरासमोरून जाणाऱ्या जुन्या बाजार रस्त्यावर पुजारी कुटुंबीय राहत आहेत. अभियंता असलेल्या सतीश पुजारी यांचा 11 महिन्यांचा मुलगा शौर्य घरात नेहमीप्रमाणे खेळत होता. खेळत खेळत शौर्य घराचा उंबरठा ओलांडून बाहेर गेला आणि घरासमोरील गटारीत पडला. गटार तुंबून त्यात गाळ साचला होता. गटारीतील पाण्यात गुदमरून शौर्यचा मृत्यू झाला.

शौर्य घरात दिसत नसल्याने कुटुंबीय हादरले. त्यांनी शोधाशोध केली असता, शौर्य घरासमोरील गटारीमध्ये पडल्याचे दिसून आले. त्याला तातडीने उपचारांसाठी इचलकरंजीतील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलिसांत करण्यात आली आहे. शौर्यच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.