महापूर नियंत्रणासाठी 457 कोटींचा आराखडा सादर, जागतिक बँकेच्या पथकाकडून कोल्हापुरात बैठका आणि पाहणी

शहरातील महापूर नियंत्रणासाठी 457 कोटींचा आराखडा तयार केला असून, मंगळवारी हा आराखडा जागतिक बँकेच्या प्रतिनिधींसमोर सादर करण्यात आला. याचे सादरीकरण महापालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात करण्यात आले.

यावेळी प्रशासक तथा आयुक्त के. मंजुलक्ष्मी, जागतिक बँकेचे प्रतिनिधी जोलांटा क्रिस्पिन वॉटसन, अनुप कारनाथ, शीना अरोरा, जर्क गॅल, विजया शेकर, ‘मित्रा’चे निखिल पंगम, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जलअभियंता हर्षजित घाटगे, उपशहर रचनाकार रमेश मस्कर, एन. एस. पाटील, उपशहर अभियंता रमेश कांबळे, आर. के. पाटील, महादेव फुलारी, सतीश फप्पे, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, कन्सल्टंट अजय ओक व कनिष्ठ अभियंता उपस्थित होते.

कोल्हापूर जिह्यात येणाऱ्या महापुराच्या उपाययोजनेसाठी जागतिक बँकेकडून निधी दिला जाणार आहे. यामध्ये पूरबाधित क्षेत्रातील कामांसाठी हा निधी मिळणार आहे. महापूर नियंत्रणासाठी 457 कोटी लागणार आहेत. हा निधी जागतिक बँकेकडून मिळावा, अशी मागणी या बैठकीत करण्यात आली. याचे स्लाइड शोद्वारे सादरीकरणही करण्यात आले. याशिवाय महापालिकेचे हॉस्पिटल, पूरबाधित क्षेत्रातील रस्ते व इतर पायाभूत सुविधांसाठीही जागतिक बँकेकडे निधीची मागणी प्रशासकांनी केली. पाणीपुरवठा, तसेच इतर पायाभूत सुविधांसाठी समितीच्या प्रतिनिधींनी सकारात्मकता दर्शविली आहे. ही समिती आठ दिवस अभ्यास करून जागतिक बँकेस अहवाल सादर करणार आहे.

दरम्यान, सकाळी समिती सदस्यांनी ताराराणी फायर स्टेशन येथे भेट देऊन महानगरपालिकेच्या आपत्तिव्यवस्थापन विभागाच्या यंत्रसामग्रीची पाहणी केली. सायंकाळी जयंती नाला, विन्स हॉस्पिटल येथील नाला, पंचगंगा नदीघाट, रिलायन्स मॉल, सुतारवाडा या ठिकाणी पूरबाधित क्षेत्राची पाहणी केली.