ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयानंतर सरकलेल्या पाकिस्तानी माजी कर्णधार इंझमाम-उल-हकने हिंदुस्थानी संघाने रिव्हर्स स्विंग होण्यासाठी चेंडूशी छेडछाड केल्याचा आरोप लावला होता. त्या आरोपामुळे चिडलेल्या हिंदुस्थानी कर्णधार रोहित शर्माने त्याच्या आरोपांना फेटाळून लावताना मेंदू जागेवर असू द्या, असा सल्ला दिला.
टी-20 वर्ल्ड कपच्या साखळीतच बाद झाल्यामुळे पाकिस्तानी संघ आणि आजी-माजी खेळाडूंची मानसिक स्थिती बिघडली होती. त्यामुळे त्यांना हिंदुस्थानची कामगिरी पाहावत नव्हती. दोन दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियावर मात केल्यानंतर हिंदुस्थानी संघाने हा विजय चेंडूशी छेडछाड करून केल्याचा आरोप इंझमामने केला. तो म्हणाला, 15 व्या षटकात अर्शदीप गोलंदाजी टाकत असतानाही चेंडू रिव्हर्स स्विंग होत होता. नवीन चेंडू इतक्या लवकर रिव्हर्स स्विंग होत नाही. याचाच अर्थ चेंडूला 12-13 व्या षटकांतच रिव्हर्स स्विंगसाठी तयार केले गेले होते. त्यामुळे चेंडू रिव्हर्स स्विंगसाठी तयार झाला. तेव्हा मैदानातल्या पंचांना आपले डोळे उघडे ठेवण्याची गरज असल्याचेही तो म्हणाला. त्याच्या आरोपांवर रोहित शर्माही बरसला. माजी पाकिस्तानी फलंदाजाने आपला मेंदू जागेवर ठेवावा. विंडीजच्या विकेट कोरडय़ा आहेत. इथे सर्वच संघांना रिव्हर्स स्विंग मिळतोय. आपल्याला आपला मेंदू जागेवर ठेवण्याची गरज आहे. हे ऑस्ट्रेलिया नव्हे, असेही खडसावून सांगितले. हिंदुस्थानसाठी पाकिस्तानी खेळाडूंचे असे आरोप नवे नाहीत. या आधीही पाकिस्तानी खेळाडू असेच हिंदुस्थानी खेळाडूंवर घसरले आहेत.