डेन्मार्क, इंग्लंड, स्लोवेनियाची बाद फेरीत धडक; डेन्मार्कची सर्बियाशी, तर इंग्लंडची स्लोवेनियाशी बरोबरी

डेन्मार्क, इंग्लंड व स्लोवेनिया या संघांनी ‘क’ गटातील आपापल्या लढतीत गोलशून्य बरोबरीत सोडवून युरो चषक फुटबॉल स्पर्धेच्या बाद फेरीत धडक दिली. डेन्मार्कने सर्बियाला गोलशून्य बरोबरीत रोखले, तर स्लोवेनियाने इंग्लंडला बरोबरीत रोखण्याचा पराक्रम केला. डेन्मार्क, इंग्लंड व स्लोवेनिया या संघांनी पात्रता क्रमवारीच्या जोरावर स्पर्धेत आगेकूच केली.

डेन्मार्कने सर्बियाविरुद्धच्या लढतीवर वर्चस्व गाजविले, पण त्यांच्या खेळाडूंना गोल करण्यात अपयश आले. सर्बियाला आगेकूच करण्यासाठी विजयाची गरज होती, मात्र डेन्मार्कने त्यांचे मनसुबे उधळून लावले. डेन्मार्कसाठी विक्रमी 133 वा सामना खेळत असलेल्या ख्रिश्चियन एरिक्सनने आपल्या संघासाठी गोलच्या काही संधी निर्माण केल्या होत्या, मात्र त्यांना संधीचे गोलमध्ये रूपांतर करता आले नाही. डेन्मार्क आणि स्लोवेनिया हे दोन संघांनी तीन सामन्यांत सारखेच 2-2 गोल केले, तर 2-2 गोल स्वीकारले. उभय संघांच्या खात्यात 3-3 गुण जमा झाल्याने दोन्ही संघांनी बाद फेरी गाठली.

दुसऱया लढतीत स्लोवेनियाने इंग्लंडला गोलशून्य बरोबरीत रोखले. अपेक्षेप्रमाणे या लढतीत इंग्लंडचेच वर्चस्व होते. इंग्लिश खेळाडूंनी तब्बल 12 वेळा स्लोवेनियाच्या गोलपोस्टवर हल्ले केले. त्यातील चार हल्ले तर अतिशय धोकादायक होते, मात्र स्लोवेनियाच्या गोलरक्षकाने हे सर्व हल्ले परतावून लावत इंग्लंडला बरोबरीत रोखले. या ड्रॉ लढतीमुळे स्लोवेनियानेही बाद फेरीत धडक दिली. ‘क’ गटातून तीन बरोबरी व एका विजयासह इंग्लंडने सर्वाधिक 5 गुणांची कमाई केली. स्लोवेनियाच्या तीनही लढती बरोबरीत सुटल्याने त्यांना 3 गुण मिळाले. या गटात सर्बियाचा संघ 2 गुणांसह तळाला राहिला. त्यामुळे या संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.