शिक्षक मतदारसंघातील मिंधे गटाचे उमेदवार, आमदार किशोर दराडे यांच्यासाठी पैशांची पाकिटे वाटणाऱयांना बुधवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱयांनी रंगेहाथ पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. या संपूर्ण प्रकरणाची निवडणूक आयोगाने चौकशी करून दराडे यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
शिक्षक मतदारसंघाच्या नाशिक येथील भालेकर विद्यालयातील मतदान केंद्राबाहेरील परिसरात बुधवारी सकाळपासूनच मिंधे गटाचे किशोर दराडे यांच्यासाठी शिक्षक मतदारांना पैशांची पाकिटे वाटली जात होती. शिवसैनिकांनी पाळत ठेवून पैसे वाटणाऱयांना रंगेहाथ पकडले. एक पुरुष आणि तीन महिला अशा चौघांना भद्रकाली पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यांच्याकडून प्रत्येकी पाच हजार रुपये असलेली चार खाकी पाकिटे, प्रत्येकी एक हजार असलेली 49 पांढरी पाकिटे आणि पाचशे रुपयांचे एक पाकिट जप्त करण्यात आले, ही एकूण रक्कम 69 हजार 500 आहे.
या सर्वांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी, निवडणूक जिंकण्यासाठी भ्रष्ट मार्गाचा अवलंब केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने सखोल चौकशी करून दराडे यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, महानगरप्रमुख विलास शिंदे, माजी आमदार वसंत गीते, मसूद जिलानी आदींनी केली आहे.
लोकशाहीला काळिमा – संदीप गुळवे
मिंधे गटाचे किशोर दराडे यांच्यासाठी पोलीस बंदोबस्तात पैशांचे वाटप केले जात होते, असा आरोप शिवसेना उमेदवार अॅड. संदीप गुळवे यांनी केला. हा लोकशाहीला काळीमा आहे. मुंबईत लोकसभेच्या मतदानावेळी झालेले प्रकार सत्ताधाऱयांकडून इथेही करण्याचे प्रयत्न झाले, जागरूक शिक्षक मतदारांनी ते हाणून पाडले, असे सांगत आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास गुळवे यांनी व्यक्त केला.