तिरुअनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सुविधा दरांत अदानी कंपनीने वाढ केल्याबद्दल केरळच्या दोन खासदारांनी चिंता व्यक्त केली. तुम्ही अदानींच्या नव्हे तर सर्वसामान्य जनतेच्या बाजूने उभे राहाल अशी आशा आहे, असे आवाहन या दोघांनी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांना केले आहे.
विमानतळ आर्थिक नियामक प्राधिकरणाने विमानतळ व्यवस्थापन पाहाणाऱया अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लि. कंपनीने उच्च वापरकर्ता विकास शुल्क आणि लँडिंग शुल्कासह इतर दरांमध्ये केलेल्या वाढीला मंजुरी दिली आहे. यासंदर्भात केरळमधील माकप खासदार जॉन ब्रिटास आणि भाकपचे खासदार बिनॉय विश्वम यांनी नागरी विमान वाहतूक मंत्री के. राममोहन नायडू यांना स्वतंत्र पत्रे लिहिली आहेत. विमान कंपन्या प्रवास भाडे वाढवतील आणि त्यामुळे प्रवाशांची विमान प्रवास परवडण्याची क्षमता कमी होईल, असे ब्रिटास यांनी पत्रात म्हटले आहे.