श्रीक्षेत्र पंढरपुरात आषाढीवारीच्या नियोजनासाठी शासकीय पातळीवर अनेक बैठका होतात, मात्र हे नियोजन कागदावरच राहते. त्यांची प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नसल्याने भाविकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. श्री विठ्ठल-रखुमाई मातेच्या पदस्पर्श दर्शनासाठी आतापासूनच भाविकांची गर्दी होत आहे. परंतु दर्शन रांगेची व्यवस्थाच उभी न केल्याने गोंधळ उडाला. रांगेत उभे राहण्याच्या कारणावरून भाविकांमध्ये धक्काबुक्की, वादावादी आणि चेंगराचेंगरी आज पहायला मिळाली.
17 जुलै रोजी होणाऱया आषाढी वारी सोहळय़ासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, मध्य प्रदेश, गोवा आदी राज्यांतून दिंडय़ा आणि पालख्यांनी पंढरीकडे प्रस्थान ठेवले आहे. देहू येथून शुक्रवारी (दि. 28) जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांची पालखी तर शनिवारी (दि. 29) आळंदीतून संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. तत्पूर्वी हजारो भाविक वारकऱयांनी श्री विठ्ठल-रखुमाई मातेच्या दर्शनासाठी पंढरपुरात गर्दी केली आहे. ही गर्दी लक्षात घेऊन मंदिर समितीने दर्शन रांगेची व्यवस्था वेळीच करणे अपेक्षित होते, मात्र अशी व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे भाविकांनीच हवी तशी दर्शन रांग लावून घेतली. काहीजण या रांगेत घुसल्यामुळे वादावादी, धक्काबुक्की आणि चेंगराचेंगरी झाली. ही माहिती मंदिर समिती व्यवस्थापनाला दिल्यानंतर समितीचे कर्मचारी आले आणि बांबूचे कठडे तयार करून दर्शन रांग केली.