महालक्ष्मी येथील रेसकोर्सची जागा हडप करण्याचा मिंधे सरकारचा डाव उधळल्यानंतर युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा मिंधे सरकारला ठणकावले आहे. रेसकोर्सची जागा मुख्यमंत्र्यांच्या बिल्डर आणि कंत्राटदार मित्रांना हडप करू देणार नाहीच, अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी ठणकावलं आहे. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदान केल्यानंतर ते प्रसारमध्यमांशी बोलत होते.
रेसकोर्सची 120 एकर जागा पालिकेच्या ताब्यात आली आहे. या जागेवर आता मुंबईकरांसाठी सेंट्रल पार्क, गार्डन आणि ओपन स्पेस मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. रेसकोर्सची मोकळी जागा ‘मिंधे’ सरकारकडून कंत्राटदार मित्र- बिल्डरांच्या घशात घालण्याचा कट आदित्य ठाकरे यांनी उघड केला होता. त्यामुळे मिंधे सरकार हादरले आणि अखेर रेसकोर्सची जागा पालिकेला देण्यासाठी मंजुरी दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे पत्रकारांशी बोलत होते.
दक्षिण मुंबईतील मोक्याच्या ठिकाणी असलेली महालक्ष्मी येथील रेसकोर्सची एकूण 211 एकर जमीन रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबला 1914 साली भाडे करारावर देण्यात आली. हा भाडे करार 2013 मध्ये संपुष्टात आला. याबाबतही आदित्य ठाकरे यांनी आग्रही भूमिका मांडली. 91 एकर जागा क्लबला भाडे तत्वावर देण्यात येणार आहे. याबाबत आम्ही सखोल चौकशीची मागणी करणार आहोत. त्या क्लबमधून आरडब्लूआयटीसीच्या वतीने तिथे जे डिल केले, ते कुणाच्या फायद्यासाठी केले? कोण कोण त्या बैठकीत होते? या सर्व गोष्टींची चौकशी लावू, असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.
या परिसरात अंडरग्राऊंड पार्किंगचीही गरज नाही. क्लब हाऊसचीही गरज नाही. तिथे मोकळे मैदान राहूनच लँडस्केपिंग राहिले पाहिजे, अशी आमची मागणी आहे. जागेच्या गैरवापर करण्याच्या कारस्थानात कोणी दोषी असतील, त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत आग्रही राहू. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या बिल्डर, कॉन्ट्रॅक्टर मित्राला ही जागा जाऊ नये, यासाठी आम्ही लढा उभारु, असा इशारा त्यांनी दिला.