वन डे वर्ल्ड कपचा हिशेब चुकता

>> द्वारकानाथ संझगिरी 

हिंदुस्थानने ऑस्ट्रेलियाला लोळवून राजेशाही थाटात उपांत्य फेरीत प्रवेश केला आणि अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियापाठोपाठ बांगलादेशाला हरवून जगाला स्तिमित केलं.

हिंदुस्थानच्या यशाचं मोठं श्रेय रोहित शर्माकडे जातं, पण इतरांचा हातभारही महत्त्वाचा ठरला. खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली असली तरी ऑस्ट्रेलियन गोलंदाजी पाटय़ावर डाळ वाटावी तशी वाटण्यासारखी नाही. रोहित या स्पर्धेत तसा फॉर्मातसुद्धा नाही. पण एक दिवस असा येतो की, सारा मोहरा फिरून जातो. त्याच्या बॅटला अचानक मोहर आला. ‘कल सेहरा था. आज एक चमन बन गया’ असं घडलं (त्या जुन्या गाण्याच्या उलट). बॅट जमीनदार झाली आणि गोलंदाज दास. त्याने फटके सर्वत्र मारले. पुल हा त्याचा पुलाव. किंचित आखूड चेंडू तो प्रंटफूटवरून पुल करतो. कधीतरी तो चुकतो. काल तो डोळय़ाला पट्टी बांधून पुल मारू शकला असता.

त्याचे इनसाईड आऊट एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह जे आरपार गेले ते विव्ह रिचर्ड्सलाही आपल्या फटक्यांच्या म्युझियममध्ये ठेवायला आवडले असते. चेंडू आपण कुठे पडणार याची त्याला आगाऊ सूचना देत होता असं वाटतं होतं. कारण कमीत कमी फुटवर्कमध्ये तो चेंडू मारण्याच्या योग्य पोझिशनमध्ये येत होता. त्याचा समतोल ट्रापिझ आर्टिस्टएवढा चांगला होता. जेव्हा तो पुढे सरसावायचा तेव्हा त्याचं पदलालित्य अत्यंत सकारात्मक आणि अचूक होतं. इतपं की, चेंडूच्या छातीत धडकी भरत असावी.

स्टार्कसारख्या जागतिक दर्जाच्या गोलंदाजाला इतपं नर्व्हस होताना मी फार क्वचितच पाहिलंय. त्याला एकच समाधान असेल की, त्याने रोहितची विकेट शतकाच्या उंबरठय़ावर घेतली. रोहितच्या अशा खेळीचा अंत फक्त ब्रह्मास्त्र करू शकत होतं. त्याचा यॉर्कर ब्रह्मास्त्रच होता. रोहित असा खेळला की, त्याची स्थूल शरीरयष्टी, पोट सर्व लपून जातं आणि फलंदाजी ‘मिस युनिव्हर्स’ होते.

सूर्यकुमार, दुबे, हार्दिक पंडय़ाने आपल्या परीने हातभार लावला, पण चांगली फलंदाजी करूनही सर्चलाईटपुढे ते मिणमिणते दिवे वाटले. अर्थात मॅच फक्त रोहितच्या फलंदाजीने संपली नाही. ती हिंदुस्थानने अप्रतिम क्षेत्ररक्षण केल्यामुळे आणि कुलदीप यादव, अक्षर पटेल, अर्शदीप आणि बुमराच्या गोलंदाजीने ही जिंकून दिली.

काय झेल घेतले गेले!

अक्षरचा सीमारेषेवरचा झेल हा जादूच्या खेळात समाविष्ट झाला असता. योग्यवेळी त्याने उडी घेतली आणि चेंडू प्रेमाने हाताला चिकटला. असे झेल स्वप्नात घेतले जातात. जेवढं हवेतून उदी काढणं खोटं तेवढंच हे हवेतून चेंडू काढणं खरं होतं. ती मार्शची विकेट अक्षरची होती. ही आणि पुढची मॅक्सवेलची विकेट या मॅचचे टर्निंग पॉइंट.

कुलदीप हा हिंदुस्थानी क्रिकेटचा कुलदीपक ठरतोय. काय गुगली टाकला! लेग स्टंपबाहेरून ऑफ स्टंप घेऊन गेला. नाहीतर हेड, मार्श, मॅक्सवेलच्या बॅट, धावांचा पाठलाग करण्याची धमकी देत होते. त्यानंतर अक्षर, बुमराने वाटेत स्पीडब्रेकर टाकले.

हिंदुस्थानने वन डे वर्ल्ड कपचा हिशेब चुकता केला.