सध्याचा भाजप व्यापारी, धनाढ्यांचा, स्त्रियांना पक्षात महत्त्व नाही; सूर्यकांता पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल

गेल्या 10 वर्षांपूर्वी माजी मंत्री सूर्यकांता पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर काही दिवसांपूर्वी त्यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत भाजपला रामराम केला होता. त्यानंतरची राजकीय भूमिका काय असेल यावर त्यांनी वेट अँड वॉच असे उत्तर दिले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. मंदळवारी पक्षाचे अध्यक्ष पवारांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. या पक्षप्रवेशानंतर त्यांनी भाजपवर कडाडून टीका केली आहे.

गेली 10 वर्षे आपण अज्ञातवासात होते, असे वाटते. मोठ्या उत्साहाने आपण भाजपत गेलो होतो. भाजप हा शिस्तीचा आणि न्यायप्रिय पक्ष असल्याचे चित्र होते. अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज हे नेते म्हणजे भाजप असे वाटत होते. मात्र, आता जो पक्ष आहे तो भाजप नाही. सध्याचा भाजप व्यापारी, धनाढ्यांचा आणि स्त्रियांना अजिबात महत्त्व न देणारा पक्ष आहे, असा हल्लाबोल माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी भाजपवर केला.

शरद पवार यांच्या पक्षात महिलांना मान देण्यात येतो. आपण आधी त्यांच्यासोबत काम केले होते. या 10 वर्षात आपण आपल्या संस्कारापासून दूर आलो असे वाटले. आपण काहीही न मागता भाजपमध्ये गेलो होतो. मात्र, ती 10 वर्षे मी अज्ञातवासात असल्यासारखे वाटले. त्यामुळे आपण ज्या पक्षातून येथे आलो, तिथे गेले पाहिजे असे लक्षात आले. त्यानंतर आपण शरद पवार यांच्याशीी चर्चा केली. त्यांनी होकार देताच मी क्षणाचा विलंब न लावता पुन्हा स्वगृही परतले असेही त्यांनी सांगितले.

तसेच मी खदखद पक्षाकडे मांडली नाही. लोककल्याणापेक्षा स्वकल्याण करण्यात भाजपचे नेतृत्व मग्न आहे. मला स्वकल्याण करायचे नाही. आपल्या 45 वर्षांच्या राजकारणात मी ते केले नाही असंही सूर्यकांता पाटील यांनी सांगितले. आपण जनतेची सेवा करण्यासाठी स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला, असेही पाटील यांनी सांगितले.