संगमनेरमधील दूधगंगा पतसंस्था अपहार प्रकरणातील मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटे हा एका तपासणीच्या नावाखाली गेल्या सात दिवसांपासून नगर सिव्हील रुग्णालयात आराम घेत आहे. तुरुंगापासून दूर राहण्यासाठी आरोपीने संगनमताने ही शक्कल लढवली असल्याचा आरोप पीडित ठेवीदार, सभासदांनी केला आहे. याबाबत ठेवीदार आक्रमक झाले असून, या प्रकरणाचा तातडीने तपास करून आरोपीला पुन्हा कोठडीत डांबण्याची मागणी करत आहेत.
दूधगंगा पतसंस्थेतील 81 कोटी रुपयांचा घोटाळा केलेला मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटे हा गुन्हा दाखल झाल्यानंतर तीन ते चार महिने फरार होता. त्यानंतर तो पोलिसांच्या स्वाधीन झाला होता. काही दिवसांपासून तो न्यायालयीन कोठडीत संगमनेरच्या कारागृहात होता. मात्र, अचानकपणे आरोपीला संगमनेरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दोन ते चार दिवसांनी लगेच नगर येथे सिव्हील हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. ‘आरोपीला कोणता आजार झाला आहे’, ‘कशासाठी नगरला हलविले आहे’, याची ठेवीदारांना माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आली. विशेष म्हणजे आरोपीला नगर येथे पाठवण्याइतके मोठे कारणही नव्हते, असे आता बोलले जात आहे. मात्र, आरोपी कुटे गेल्या सात दिवसांपासून नगरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आराम घेत आहे. अगदी किरकोळ तपासण्या करण्यासाठी कुटेला सात दिवसांपासून सिव्हील हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले आहे.
संगमनेरचे तहसीलदार तथा दुय्यम कारागृह अधीक्षकांनी आरोपीसाठी नगरच्या जिल्हा शल्यचिकित्सकांना पत्र दिले होते. त्यांच्याकडूनही सुरुवातीला कुठलीही माहिती देण्यात आली नाही. सिव्हील सर्जन डॉ. संजय घोगरे यांनीही पाहून माहिती देतो, असे सांगितले होते. विशेष म्हणजे सात दिवसांपासून आरोपी उपचारासाठी आला असून, संपर्क करूनही सिव्हिल सर्जन अद्यापपर्यंत माहिती देत नाहीत. यामागचे गौडबंगाल काय, असा सवाल ठेवीदार करीत आहेत.
वैद्यकीय अधिकाऱ्यांनी खुलासा करावा
आमच्या आयुष्यभराच्या कमाईचे वाटोळे करून पैसा आणि राजकीय सत्तेचा वापर करीत मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटे हा संगमनेर येथील वैद्यकीय, प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संगनमत करून आजाराचे कारण काढून गेल्या सात दिवसांपासून नगर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आराम करत आहे. तुरुंगात राहण्याचे टाळून रुग्णालयात आराम करण्याचा हा आरोपीचा डाव आहे. त्यामुळे आरोपीला नेमके काय झाले आहे, याबाबत आम्हाला शंका आहे. याबाबत नगरच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी खुलासा करावा, अशी मागणी ठेवीदार अनिल जोंधळे, कैलास देशमुख, एस. टी. देशमुख, हेमंतराजे पवार, प्रकाश गुंजाळ, डॉ. विक्रमसिह ढोमसे, प्रभाकर राहणे यांनी केली आहे.
सिव्हिल सर्जन यांची उडवाउडवीची उत्तरे
नगर जिल्हा रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन डॉ. संजय घोगरे यांच्याशी संपर्क केला असता, ‘या संदर्भात माहिती घेऊन कळवतो’, असे सांगितले. सायंकाळी पुन्हा संपर्क केला असता, ‘मी दिवसभर जिल्हाधिकाऱ्यांकडे होतो’, असे सांगत टाळाटाळ केली. त्यानंतर ‘आरोपीच्या चेहऱ्यावर फोड आल्याने त्यांच्यावर फिजिशियन आणि सर्जनकडून उपचार करायचा आहे’, असे त्यांनी फोन करून माहिती दिली. तसेच प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने जास्त माहिती देता येणार नाही, असेही सांगितले. मात्र, संगमनेर ग्रामीण रुग्णालयातून दिलेल्या आरोपीच्या वैद्यकीय मेमोवर सिव्हील सर्जन यांनी सांगितल्याप्रमाणे कुठलाही उल्लेख नसल्याचे आढळले आहे.