‘नीट’ परीक्षेचा ‘लातूर पॅटर्न’ पाहून तपास करणार्या एटीसचे डोकेही चक्रावून गेले आहे. पेपर फोडण्यापासून ते पास करेपर्यंत, या पद्धतीने हे रॅकेट काम करत असल्याचे समोर आले आहे. राजकीय नेते, उद्योगपती, उच्चपदस्थ अधिकार्यांनीही या टोळीला हाताशी धरून आपल्या पाल्यांच्या भविष्याची ‘नीट’ सोय करून घेतल्याची धक्कादायक माहिती आहे. दरम्यान, या प्रकरणी एटीएसच्या तक्रारीवरून लातूर येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध पेपरफुटी प्रकरणात नुकत्याच करण्यात आलेल्या नव्या कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सध्या देशभरात गाजत असलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे ‘लातूर पॅटर्न’ म्हणून देशभरात प्रख्यात असलेल्या लातूरपर्यंत पोहोचले. काल नांदेड एटीएसने लातुरात झाडाझडती घेऊन चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. एटीएसचे पोलीस उपनिरीक्षक आवेज काझी यांनी दिलेल्या तक्रारीत नव्या कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात यावा असे स्पष्ट म्हटले आहे. या तक्रारीवरून जलीलखान उमरखान पठाण याला अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्याला २ जुलैपर्यंत पोलीस कोठडी दिल्याचे अॅड. अजित पाटील यांनी सांगितले.
शिक्षक, क्लासचालकांची कसून चौकशी
‘नीट’ पेपरफुटीचे लोण लातूरपर्यंत आल्याची माहिती मिळाल्यानंतर नांदेड एटीएसच्या अधिकार्यांनी काही शिक्षक, क्लासचालकांना रडारवर घेतले. त्यांच्यावर पाळत ठेवण्यात आली. ठोस माहिती हाती आल्यानंतर एटीएसने जलीलखान पठाण (रा. कातपूर), सोलापूर जि.प. शाळेत शिक्षक असलेले संजय तुकाराम जाधव (रा. बोथी तांडा, ता. चाकूर), उमरगा येथे आयटीआय शिक्षक असलेले इरण्णा मशनाजी कोंगलवार (रा. लातूर) यांना ताब्यात घेतले. चौकशीत गंगाधर हे एक नाव देखील समोर आले. हा दिल्लीतील असल्याचे सांगण्यात आले. सखोल चौकशीनंतर या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, जलीलखान याला बेड्या ठोकण्यात आल्या.
असे चालत होते रॅकेट
‘नीट’ची परीक्षा जाहीर होताच आरोपींनी विद्यार्थ्यांसाठी व्हॉट्सअॅपवर वेगवेगळे ग्रुप बनवले. या ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ‘पेपर फोडण्यापासून ते पास करेपर्यंत’ची हमी घेत असल्याचे सांगण्यात आले. व्हॉट्सअॅपवरच देण्याघेण्याचे व्यवहारही ठरले. पेपर फोडणे, पेपरला बोगस विद्यार्थी पाठवणे, परीक्षा केंद्र ठरवून देणे, पेपर वर्गाच्या बाहेर मागवून घेणे आणि बरोबर उत्तरे लिहून तो वेळेच्या आत वर्गात पाठवणे, अशी सर्व जबाबदारी या रॅकेटने घेतली होती.
नवीन कायद्यानुसार कलमे वाढवली
पेपर फुटीच्या अनुषंगाने केंद्र सरकारने नुकताच नवीन कायदा तयार केला आहे. या नवीन कायद्यानुसार नीट प्रकरणातील या चौघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस निरीक्षक भागवत फुंदे हे करीत आहेत. ज्या चौघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यातील तिघे जण हे शिक्षकी पेशातील असून, चौथा व्यक्ती हा दिल्लीतील असल्याचे समोर आले आहे.
पेपरफुटीचे रॅकेट, बड्या धेंडाचे अपत्य
अनेक वर्षांपासून लातूर पॅटर्न राज्यात प्रसिद्ध आहे. त्यामुळे येथे शिक्षणासाठी येणारांची संख्याही प्रचंड आहे. त्यात मोठे उद्योगपती, राजकीय नेते, उच्चपदस्थ अधिकार्यांच्या पाल्यांचीही संख्या लक्षणीय आहे. पेपरफुटीचे हे रॅकेट याच बड्या धेंडांचे अपत्य असल्याचे बोलले जात आहे. या रॅकेटला हाताशी धरून अनेकांनी आपल्या ‘ढ’ पाल्यांना डॉक्टर, इंजिनिअर बनवल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे गेल्या वर्षातील लातूरातही काही विशिष्ट बँकांमधून झालेले लाखोंचे व्यवहारही तपासण्यात यावेत अशी मागणी होत आहे.