रत्नागिरी जिह्यातील प्राथमिक शाळेतील नराधम शिक्षकाला उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला. शिक्षकाने तीन अल्पवयीन मुलींचे केलेले लैंगिक शोषणाचे कृत्य अत्यंत गंभीर आहे, असे मत नोंदवत न्यायमूर्ती किशोर संत यांनी आरोपी रमेश जाधवची पाच वर्षांची शिक्षा कायम ठेवली. जाधवला अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत दोषी ठरवले होते.
सरकारी पक्षाच्या म्हणण्यानुसार, डिसेंबर 2021 मध्ये रमेश जाधवने शिकवत असतानाच वर्गात अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केले होते. यादरम्यान त्याने वर्गात मुलींना ठेवले आणि मुलांना वर्गाबाहेर पाठवले होते. याप्रकरणी पोलिसांनी 24 डिसेंबर 2021 रोजी जाधवविरुद्ध भारतीय दंड संहितेसह ‘पोक्सो’ कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली होती. नंतर आरोपपत्र दाखल करून खटला चालवण्यात आला. खटल्यादरम्यान पीडित मुलींपैकी एका मुलीच्या आईने नराधम जाधवच्या कृत्याबद्दल मुलींनी सांगितलेल्या घटनाक्रमाच्या अनुषंगाने साक्ष दिली होती. त्याआधारे अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी 14 फेब्रुवारी 2023 रोजी जाधवला पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली होती. या शिक्षेला जाधवने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. तथापि, तक्रारदार महिलेची साक्ष, पीडित मुलींनी नोंदवलेला जबाब व इतर पुरावे विश्वासार्ह मानत न्यायमूर्ती संत यांनी जाधवची शिक्षा कायम ठेवली.