लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी मुंबापुरीत आतापासून लगबग सुरू झाली आहे तर बाप्पाच्या स्वागतासह विसर्जन निर्विघ्न पार पडावे यासाठी मुंबई महापालिकेने तलावांतील गाळ काढणे, साफसफाई करायला सुरुवात केली आहे. त्यासाठी मुंबई महापालिका निविदा प्रक्रिया राबवणार आहे.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व घराघरात 7 सप्टेंबरला लाडक्या गणरायाचे आगमन होणार आहे. देशविदेशात बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येते. देशात गणेशोत्सव मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात येतो. परंतु मुंबईत गणेशोत्सवाची धूम वेगळीच असते. गणेशोत्सवात दहा दिवस मुंबापुरी उजळून निघते. लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी मुंबई महापालिका सज्ज झाली आहे.
स्वच्छतेसाठी 98 लाखांचा खर्च
बाप्पाच्या स्वागतासाठी मुंबई महापालिकेकडून तयारी सुरू असताना विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची निर्मिती करणे, नैसर्गिक तलावातील गाळ उपसा करणे, साफसफाई करणे आदी कामे हाती घेण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर मुलुंड पूर्वेकडील मोरया तलाव, गणेश घाट तलाव व भोईर तलावातील गाळ उपसा करणे व साफसफाईचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी पालिका तब्बल 98 लाख 13 हजार 720 रुपये खर्च करणार आहे. पालिकेने निविदा प्रक्रिया राबवली असून पात्र पंत्राटदाराला काम देण्यात येणार आहे.