हिंदुस्थानी महिलांचे निर्भेळ यश, दक्षिण आफ्रिकेला 3-0 फरकाने लोळविले

यजमान हिंदुस्थानच्या महिला संघाने तिसऱया एकदिवसीय क्रिकेट सामन्यात पाहुण्या दक्षिण आफ्रिकेवर 6 फलंदाज व तब्बल 56 चेंडू राखून विजय मिळविला. विजयाच्या हॅटट्रिकसह हिंदुस्थानने या मालिकेत दक्षिण आफ्रिकेला 3-0 फरकाने लोळवित निर्भेळ यश संपादन केले.  90 धावांची खेळी करणारी मराठमोळी स्मृती मानधना या सामन्याची मानकरी ठरली, तर ‘मालिका वीरांगना’चा बहुमानही तिलाच मिळाला.

दक्षिण आफ्रिकेकडून मिळालेले 216 धावांचे लक्ष्य हिंदुस्थानने 40.4 षटकांत 4 बाद 220 धावा करीत सहज पूर्ण केले. लागोपाठ दोन शतके ठोकणारी सलामीवीर स्मृती मानधनाने तिसऱया सामन्यातही 90 धावांची खेळी केली. याचबरोबर शफाली वर्मा (25), प्रिया पुनिया (28), कर्णधार हरमनप्रीत कौर (42) व जेमिमाह रॉड्रिग्ज (नाबाद 19) यांनी उपयुक्त खेळी केली. रिचा घोषने षटकार ठोकून सामना संपविला. दक्षिण आफ्रिकेकडून आयबोंगा खाका, तुमी सेखुखुणे व नॉनपुलुलेको मलाबा यांनी प्रत्येकी एक बळी टिपला. त्याआधी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने 8 बाद 215 धावसंख्या उभारली. यात कर्णधार लॉरा वोल्वार्ड (61), तझमीन ब्रिट्स (38), नादिन डी क्लार्क (26) व मिके डे रिडर (26) यांनी उपयुक्त फलंदाजी केली. हिंदुस्थानकडून अरुंधती रेड्डी व दीप्ती शर्मा यांनी 2-2 फलंदाज बाद केल्या, तर श्रेयंका पाटील व पूजा वस्त्राकर यांनी 1-1 बळी टिपला.