3 बाद 32 अशा बिकट अवस्थेनंतर ग्लेन मॅक्सवेल आणि मार्कस स्टॉयनिस यांनी डाव सावरत ऑस्ट्रेलियाला विजयाच्या ट्रकवर आणले होते. तेव्हा ऑस्ट्रेलियाची जमलेली जोडी पह्डण्यासाठी राशीद खानने चक्क आठवा गोलंदाज म्हणून गुलबदिन नईबच्या हाती चेंडू देण्याचा जुगार खेळला आणि या आठव्या गोलंदाजाने आपला चेंडूचा प्रताप दाखवताना ऑस्ट्रेलियाचे धडाधड चार फलंदाज बाद करत अफगाणिस्तानला टी-20 वर्ल्ड कपमधील आजवरचा संस्मरणीय आणि ऐतिहासिक विजय मिळवून दिला. अफगाणिस्तानने आपल्या क्रिकेट कारकीर्दीत या बाप संघाला प्रथमच हरवण्याचा इतिहास रचला. अवघ्या 149 धावांचा पाठलाग करणारा जगज्जेता ऑस्ट्रेलियन संघ 127 धावांत आटोपला आणि अफगाणिस्तानने 22 धावांचा सनसनाटीपूर्ण विजय मिळवत उपांत्य फेरी प्रवेशाच्या आशांना संजीवनी दिली. आता पहिल्या गटात नेट रनरेटचा तिढा सोडवत कोणताही संघ उपांत्य फेरी गाठू शकतो.
ऑस्ट्रेलियाचा अपेक्षाभंग करणारा खेळ
आज ऑस्ट्रेलिया आपल्या लौकिकानुसार खेळ करूच शकली नाही. प्रथम गोलंदाजी करताना त्यांनी सोडलेले झेल, त्यांच्या गचाळ क्षेत्ररक्षणामुळे त्यांनी अफगाणिस्तानला 148 धावांपर्यंत पोहोचू दिले. त्यानंतर पाठलाग करताना दिग्गज खेळाडूंचा निराशाजनक खेळ ऑस्ट्रेलियाला विजयापासून दूर नेऊन गेला. आज केवळ बेभरवशाच्या ग्लेन मॅक्सवेलने 59 धावांची खेळी करत ऑस्ट्रेलियाला विजयाचे स्वप्न दाखवले होते. पण अन्य फलंदाज नवीनुल हक आणि गुलबदिन नईबच्या माऱयापुढे कोसळले. नवीने भेदक सुरुवात करताना ट्रव्हिस हेडचा शून्यावरच त्रिफळा उडवला आणि दुसऱया षटकात कर्णधार मिशेल मार्शचा अडसर दूर केला. 3 बाद 32 अशी बिकट स्थिती असताना मॅक्सवेल संघाच्या मदतीसाठी उभा राहिला. तो असेपर्यंत विजय शंभर टक्के ऑस्ट्रेलियाच्याच हातात होता. सलग विजयाचा षटकार ठोकणारा ऑस्ट्रेलिया आठव्या गोलंदाजामुळे सातवा सामना हरला.
गुलबदिनने सामना फिरवला
मॅक्सवेल आणि स्टॉयनिसने पाच षटके खेळपट्टीवर टिकत सामना ऑस्ट्रेलियाच्या बाजूने वळवला. दहा षटकांत 79 धावांची गरज होती. राशीद खानने 7 गोलंदाज वापरले होते. ही जोडी पह्डण्यासाठी त्याने गुलबदिनच्या हातात चेंडू दिला. तेव्हा सारेच अवाप् झाले. जो तो राशीदला मूर्खात काढत होता. पण गुलबदिनने ही जोडी पह्डत चमत्कार घडवला आणि मग प्रत्येक षटकात एक-एक विकेट घेत संघाच्या ऐतिहासिक विजयावर शिक्कामोर्तब केला. त्याने 20 धावांत 4 विकेट टिपण्याचा भीमपराक्रम करत ऑस्ट्रेलियन डावाला संपवले. याआधी अफगाणिस्तान वन डे आणि टी-20 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकही सामना जिंकला नव्हता. यापूर्वी दोघांमध्ये चार वन डे आणि एक टी-20 सामना झाला होता व सर्व सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले होते. मात्र उभय संघात अद्याप एकही कसोटी सामना खेळला गेलेला नाही.
कमिन्सचा हॅट्ट्रिक विश्वविक्रम
आज अफगाणच्या रहमानुल्लाह गुरबाज (60) आणि इब्राहिम झदरान (51) यांनी स्पर्धेतील तिसरी शतकी सलामी देताना 118 धावांची भागीदारी रचली, पण ही भागीदारी फुटताच अफगाणी डाव कोलमडला. त्यांनी 26 चेंडूंत केवळ 30 धावा काढत 6 विकेट गमावल्या. परिणामतः तो बिनबाद 118 वरून 6 बाद 148 धावा करू शकला. ही सारी करामत पॅट कमिन्सच्या हॅट्ट्रिकने करून दाखवली. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलग सामन्यात हॅट्ट्रिक घेत वसीम अक्रमच्या 26 वर्षांपूर्वीच्या विक्रमाची बरोबरी साधली. पण अक्रमने हा पराक्रम सलग कसोटीत केला होता. तसेच 1912 साली इंग्लंडच्या जिमी मॅथ्यूजने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मँचेस्टर कसोटीत दोन्ही डावांत हॅट्ट्रिक करण्याचा दुर्मिळ विश्वविक्रम केला होता. दोन दिवसांतच संपलेल्या या कसोटीत दुसऱया दिवशी आफ्रिकेला फॉलोऑन देत हा विक्रम केला होता. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटच्या इतिहासात लसिथ मलिंगा, टीम साऊदी, सर्बियाचा मार्क पावलोविक, माल्टाचा वसीम अब्बास यांनी दोन हॅट्ट्रिक घेतल्या आहेत. आता यात कमिन्सच्या नावाचाही समावेश झाला आहे. फक्त पावलोविकने सलग दिवसांत तीन सामन्यांत दोन हॅट्ट्रिक टिपल्या होत्या.