अफगाणिस्तानने टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपच्या सुपर-8 लढतीत ऑस्ट्रेलियावर मात करीत गतवर्षी हिंदुस्थानात झालेल्या वन डे वर्ल्ड कपमधील पराभवाचा हिशेब चुकता केला. आता टीम इंडियालाही उद्या (दि.24) ऑस्ट्रेलियाला पराभूत करत वर्ल्ड कपमधून आऊट करून बदला घेण्याची संधी असेल. कारण याच ऑस्ट्रेलियाने गतवर्षीच्या वन डे वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये हिंदुस्थानच्या जगज्जेतेपदाच्या स्वप्नांचा चक्काचूर केला होता. अफगाणिस्तानविरुद्धच्या अनपेक्षित पराभवामुळे ऑस्ट्रेलियासाठी अखेरची सुपर-8 लढत म्हणजे ‘जिंका किंवा मरा’ अशीच असेल.
गतवर्षीच्या वन डे वर्ल्ड कपमध्ये मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर अफगाणिस्तानने 291 धावसंख्या उभारून ऑस्ट्रेलियाची 7 बाद 91 अशी दुर्दशा केली होती, मात्र ग्लेन मॅक्सवेलने नाबाद द्विशतकी खेळी करीत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला होता. त्या हातातून निसटलेल्या विजयाची भरपाई अफगाणिस्तानने टी-20 वर्ल्ड कपमध्ये केली. आता वेळ आहे, त हिंदुस्थानला वर्ल्ड कपच्या फायनलमधील ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या पराभवाचा बदला घेण्याची. सुपर-8 फेरीच्या अखेरच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत करून घरी पाठविण्याची संधी हिंदुस्थानला चालून आली आहे.
हिंदुस्थानचा संघ सध्या जबरदस्त सांघिक कामगिरी करतोय. मात्र पक्के व्यायसायिक असलेल्या ऑस्ट्रेलियासारख्या संघाविरुद्ध आता आघाडीच्या फळीतील कोणीतरी किल्ला लढविण्याची गरज आहे. कर्णधार रोहित शर्मासह विराट कोहली, रिषभ पंत व सूर्यकुमार यादव यांच्यापैकी कोणीतरी शेवटपर्यंत फलंदाजी केल्यास हिंदुस्थानला आव्हानात्मक धावसंख्या उभारता येईल. गोलंदाजीमध्ये जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह, हार्दिक पंडय़ा, कुलदीप यादव व अक्षर पटेल यांच्यावर मोठी जबाबदारी असेल.
ऑस्ट्रेलियाकडेही ट्रव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, कर्णधार मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोईनिस, टीम डेव्हिड, मॅथ्यू वेड व पॅट कमिन्स अशी खोलवर फलंदाजी आहे. कमिन्ससह जोश हेझलवूड, अॅडम झम्पा व एस्टोन एगर अशी वैविध्यपूर्ण गोलंदाजीही ऑस्ट्रेलियाच्या दिमतीला आहे. मात्र, हार्दिक पंडय़ा, रवींद्र जाडेजा, शिवम दुबे, अक्षर पटेल व कुलदीप यादव या पाच अष्टपैलू खेळाडूंमुळे हिंदुस्थानचे पारडे नक्कीच ऑस्ट्रेलियापेक्षा सरस आहे. अफगाणिस्तानकडून झालेल्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियन कर्णधार मिचेल मार्शने ‘पराभव करण्यासाठी हिंदुस्थानहून अधिक कोणता सोपा संघ असू शकतो,’ अशा शब्दांत रोहित शर्माच्या सेनेला डिवचले आहे. त्यामुळे हिंदुस्थानी खेळाडूही उद्या मैदानावर जिवाचे रान करताना दिसतील, एवढं नक्की.