शेतकऱयांना भूमिहीन करून महापुराचा धोका वाढविणारा प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा, या मागणीसाठी सुरू असणाऱया आंदोलनावेळी आंदोलकांनी आज पालकमंत्री सुरेश खाडे यांची गाडी अडविली. या प्रकरणामुळे पोलीस यंत्रणेची धावपळ उडाली.
सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात आमदार डॉ. विश्वजीत कदम, आमदार विक्रम सावंत, खासदार विशाल पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्यासह शक्तिपीठ महामार्ग विरोधी कृती समितीचे कार्यकर्ते, भाजपाचे पृथ्वीराज पवार, शिवसेनेचे जिल्हा संघटक बजरंग पाटील, माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील सहभागी झाले होते. महामार्ग स्थगित करण्याऐवजी सरकारने हा मार्ग रद्द करावा, अशी आग्रही मागणी केली. पालकमंत्री सुरेश खाडे नियोजन समितीच्या बैठकीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात येत असताना त्यांची गाडी अडविण्यात आली. या वेळी खाडे यांनी मोटारीतून उतरून निवेदन स्वीकारले.
सांगली जिह्यातील 19 गावांतून शक्तिपीठ महामार्ग जात असून, पाच हजार शेतकरी बाधित होत आहेत. यात शेतकऱयांची जमीन जात आहे, त्यांना जमिनीचा अत्यंत कमी मोबदला मिळणार आहे. तासगाव, कवठेमहांकाळ व आटपाडी या तालुक्यांत सिंचन योजना अलीकडेच पूर्ण झाल्या असल्यामुळे शेतकऱयांनी स्वभांडवलावर जमिनी विकसित केल्या आहेत. त्यांचा तोटा होणार असून, अनेक शेतकरी भूमिहीन होणार आहेत.
मिरज तालुक्यातील गावांना महापुराचा धोका उद्भवणार आहे. या महामार्गासाठी कर्नाळपासून कोल्हापूर जिह्यातील शिरोळ तालुक्यातील गावांपर्यंत भराव पडल्यास पावसाळ्यात कृष्णा आणि वारणा नद्यांचे पाणी पात्राबाहेर आल्यानंतर ते लवकर हटणार नाही. दुर्दैवाने महापूर आलाच तर सांगली शहर व परिसरातील गावांना फार मोठा फटका बसणार आहे. ज्या कारणासाठी हा महामार्ग प्रस्तावित केला आहे, ती सर्व देवस्थान शक्तिपीठे रत्नागिरी-नागपूर या महामार्गाला जोडता येऊ शकतात. त्यामुळेच नवीन महामार्गाची गरज नाही म्हणून शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. यावेळी हा महामार्ग रद्द करण्यासाठी मी तुमच्यासोबत असेल, अशी ग्वाही पालकमंत्री खाडे यांनी दिली.