आदित्य ठाकरे यांनी घेतली राज्यपालांची भेट, CET च्या गोंधळात हस्तक्षेप करण्याची मागणी

इंजिनीयरिंग, मेडिकल आणि फार्मसी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या सीईटीत घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात फेरपरीक्षा घेण्यापेक्षा या संपूर्ण घोटाळय़ाची सखोल चौकशी करा आणि हा गोंधळ दूर होईपर्यंत प्रवेशांना स्थगिती द्या, अशी मागणी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी केली. दरम्यान शनिवारी आदित्य ठाकरे यांनी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी CET च्या गोंधळात राज्यपालांनी हस्तक्षेप करावा अशी विनंती केली आहे.

आदित्य ठाकरे यांनी रमेश बैस यांना एक निवेदन दिले असून CET सेलला काही मुद्द्यांवर सूचना करण्याची विनंती केली. यावेळी त्यांनी 1) विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका खुल्या करायला हव्यात, 2) फक्त पर्सेंटाईल नव्हे, तर विद्यार्थ्यांचे गुण जाहीर करायला हवेत. 3) पर्यायांमधील 54 चुकांसाठी पेपर सेट करणाऱ्यांना जबाबदार धरायला हवे. 4) ज्यांनी 1425 आक्षेप घेतले आहेत त्यांना पूर्ण परतावा मिळायला हवा. अशा सूचना सेलला कराव्यात अशी विनंती राज्यपाल अनिल बैस यांना केली आहे.

तसेच मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या रखडलेल्या निवडणुका लवकरात लवकर घेण्याचीही विनंती आदित्य ठाकरे यांनी केली. यावेळी त्यांच्या सोबत माजी सिनेट सदस्य प्रदीप सावंत आणि राजन कोळंबकर होते.