मनतरंग – दुसरा अंक…

>> दिव्या नेरुरकर-सौदागर

संकेत व किमया या दोघांनाही गावी जायचं म्हणजे दिव्य वाटायचं. दोघेही प्रचंड ताणात राहात. त्याचं मुख्य कारण होतं संकेतच्या आईचं वर्तन. ते दोघंही गावाला आईवडिलांकडे राहायला आले की, त्या क्षणापासून संकेतच्या आईच्या पारी सुरू होत असत. किमयाच्या हालचालींवर ती बारीक लक्ष ठेवून असे. आईला स्वतच्या पद्धतीनुसारच कामं करून हवी असत. त्याचप्रमाणे तिला किमया-संकेतच्या संसारात आणि किमयामध्ये त्रुटी दिसत.

किमया आणि तिचा नवरा संकेत (नावे बदलली आहेत) गावाला संकेतच्या घरी पंधरा दिवसांसाठी जाणार होते. संकेतचे आई-वडील तिथे वास्तव्यास होते. तसंही किमया आणि संकेत दरवर्षी दोनदा गावाला जात असत, पण किमयाला जाण्याच्या एक आठवडा आधीपासूनच काही ना काही शारीरिक पारी सुरू होत असत. तिला कधी पोटदुखी, तर कधी अंगदुखी सुरू होई. डोकं तर कायम दुखतच असे. त्यामुळे कधीही गावाला जाताना तिच्याकडे सगळ्या गोळ्या असत तसंच त्या दोघांमध्ये छोटय़ा-मोठय़ा कारणांवरून खटके उडत. मग तो अबोला गावाला जाईपर्यंत टिकून राही. या वेळीही तसंच झालं. किमयाच्या शारीरिक पारींना संकेत वैतागला. “तुला कायम गावाला जातानाच कसं काय दुखतं? तिकडेही तू दोन दिवस झोपून असतेस. मग माझी आई माझ्यामागे भुणभुण लावते,” असं त्याने म्हणताच भांडय़ाला भांडं लागलं. “मला टेन्शन येतं रे. तुला कितीदा सांगितलंय. सासूबाईंकडे जायचं असेल तर मला झोप लागत नाही की भूक लागत नाही. अजून किती वेळा तेच तेच सांगू?” किमया रडत रडत म्हणाली. तिला रडताना बघून संकेतही विरघळला. तिचा मूड ठीक व्हावा म्हणून ते दोघेही जरा एकत्र बाहेर फिरायला बाहेर पडले. आईपीम खाता खाता संकेत किमयाला म्हणाला, “मला तुझ्यावर खरं तर मघाशी रागवायचं नव्हतं. तुला कदाचित खरं वाटणार नाही; पण मलाही गावाला आई-बाबांकडे जायचं म्हटलं तर टेन्शनने झोप उडते आणि त्या घरी पाऊल ठेवलं की, थोडं धडधडल्यासारखं होतं.” किमयाला हे नवीन होतं. “मग बोलला का नाहीस माझ्याशी तू?” तिने असं विचारताच “आई-वडिलांबद्दल मला तुझ्या मनात द्वेष निर्माण करायचा नव्हता म्हणून” असं प्रत्युत्तरादाखल संकेत म्हणाला. दुसऱयाच दिवशी संकेतने समुपदेशनासाठी वेळ निश्चित केली आणि आल्यावर संकेत आणि किमयाने थेट मुद्दय़ालाच हात घातला.

दोघांनाही गावी जायचं म्हणजे दिव्य वाटायचं. दोघेही प्रचंड ताणात राहात. त्याचं मुख्य कारण होतं संकेतच्या आईचं वर्तन. ते दोघंही त्यांच्याकडे राहायला आले की, त्या वेळेपासून आई तिच्या पारी सुरू करत असे. किमयाच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून असे. आईला स्वतच्या पद्धतीनुसारच कामं करून हवी असत. त्याचप्रमाणे तिला किमया-संकेतच्या संसारात, विशेषत किमयामध्ये त्रुटी दिसत. त्यामुळे ती संकेतला कायमच काही ना काही समजुतीच्या (?) गोष्टी सांगत राही.

“सुरुवातीला मी ऐकत गेलो. तिथेच माझं चुकलं मॅडम.” संकेतने आता दोघांच्याही समस्येचे कारण सांगायला सुरुवात केली. संकेतच्या बोलण्यावरून असं जाणवलं की, त्याच्या आईमध्ये फेरफार करत (मॅनिप्युलेशन) बोलण्याची सवय होती, जो आता तिचा स्वभाव बनला होता. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर त्याची आई दोघांनीही घरात पाऊल ठेवल्याबरोबर किमयाला टोमणे मारायला सुरुवात करायची. “संकेत, बाहेरचंच जास्त खातोस का रे?” असं बोलून दोघांचं स्वागत करायची. किमयाला प्रत्युत्तर देता येत नसल्याने ती गप्प राही. किमयाच्या काम करण्यावर, चालण्याबोलण्याच्या पद्धतीवरही आईचं टीकात्मक बोलणं असे. गावातील बायका किंवा सगेसोयरे त्यांच्या घरी आल्यावर तिचं वागणं जरा जास्त होई. त्यामुळे किमया तिकडे बावरलेली असे.

संकेतही यातून सुटला नव्हता. त्याने गावाजवळील शहरी भागात वास्तव्यास यावं असं त्याच्या आईला वाटे. मग ती जवळ राहायला या असं आडून आडून सुचवत असे. गावातले मित्र त्याला भेटायला आल्यावरही त्यांच्या समोर हे बोलून दाखवत असे. “मॅडम, त्या दिवशी हाच प्रकार घडला. आम्ही दोघंही फिरायला बाहेर पडणार होतो. तेवढय़ात माझे दोन मित्र आले. ते अधूनमधून आई-बाबांच्या घरी चक्कर टाकतातच. ते आल्यावर माझ्या आईने जे काही त्यांचं गुणगान गायलं की, त्यांनाही लाजल्यासारखं झालं. ती पटकन म्हणाली की, तुमच्यासारखी मुलं, जी आईबापाकडे राहतात, ते आई-बाप भाग्यवानच! आमच्या नशिबी कुठे आहे सुख? इतकं बोलून तिने जीभ चावली आणि आमच्याकडे चोरून बघतच आत गेली. मला त्या दिवशी खूप हर्ट झालं.” संकेत हे बोलताना भावनाविवश झाला.

किमयाने पुढे बोलायला सुरुवात केली, “त्या दिवशी घरात वादावादी झाली. हा फक्त त्यांना ‘असं का बोललीस?’ हे विचारायला गेला, तर सासूबाईंनी भरपूर रडारड केली. इतकी की, कोणालाही वाटावं, किती अन्याय होतोय घरी! प्रत्यक्षात मात्र संकेत खूप जबाबदार मुलगा आहे. त्याचं त्या दोघांकडेही व्यवस्थित लक्ष असतं. मात्र त्या प्रकारानंतर त्याने त्यांना रोज फोन करणं बंद केलंय.”

त्या दोघांना होणारा मनस्ताप हा भरपूर होता. त्यात संकेत जास्त भरडला जात होता. एकीकडे किमयाची आणि दुसरीकडे आईची प्रतिमा एकमेकींसमोर जपणं हे त्याच्यासाठी आव्हान होतं. त्याचे वडील मात्र यातून अंग काढून घेत.

घरातल्या अशा व्यक्तीं सोबत जुळवून घेणं खूप कठीण जातं. तसंच त्यांचा स्वभाव घरातील शांती बिघडवतो. असा स्वभाव म्हणजे पराचा कावळा करणं, दुसऱया व्यक्तींना कायम दोषी ठरवणं किंवा त्यांना अपराधी वाटेल अशा पद्धतीने वागणं, खोटं बोलणं, राग चुकीच्या पद्धतीने व्यक्त करणं, एकदम शांत बसणं किंवा घरातल्या निर्णयांमध्ये लक्ष न घालणं, चुकीच्या पद्धतीने (बालिश प्रकार) लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करणं, स्वतला कायम दुसऱयाच्या नजरेत असहाय्य दाखवण्याचा प्रयत्न करणं असा काहीसा असतो. त्यामुळे घरातला ताण वाढतो आणि नकारात्मक वातावरण निर्माण होतं.

म्हणूनच अशा स्वभावाशी दोन हात करण्यासाठी हे काही पर्याय आहेत. योग्य त्या भूमिकेवर ठाम राहणं. फेरफार (मॅनिप्युलेशन) करणाऱया सदस्याबरोबर अंतर ठेवणं. अतिशय मोजकं आणि स्पष्ट बोलणं. स्वतच्या मतांचा, भूमिकेचा आदर करणं. त्यांच्या बेताल किंवा अर्थहीन बोलण्याकडे दुर्लक्ष करणं.

“आमच्यासाठी हे पर्याय थोडे कठीण वाटताहेत. कारण आम्हाला त्यांचा अनादर करायचा नाही.” किमयाच्या बोलण्यावर संकेतने मान डोलावली. “तुम्हाला सुचवलेले पर्याय हे तुमच्या आईच्या मानसिक स्वास्थ्यासाठी गरजेचे आहेत. कारण असंच जर ती वागत राहिली तर नंतर तिलाच मानसिक आणि शारीरिक त्रास होऊ शकतात.” असे सांगितल्यावर त्यांनी “आम्ही प्रयत्न करू” असे आश्वासन दिले. समुपदेशनाच्या मदतीने सकारात्मक परिणाम दिसायला सुरुवात झाली. किमया आणि संकेतचा ताण बऱयाच अंशी कमी झाला होता. अशा प्रकारे त्यांच्या आयुष्यात दुसऱया अंकाला सुरुवात झाली होती.

[email protected]
(लेखिका मानसोपचारतज्ञ व समुपदेशक आहेत.)