>> दिलीप ठाकूर
तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, पण सत्तरच्या दशकापर्यंत रुपेरी पडद्यावर भुताची चाहूल लागली की, पडद्यावरून नजर हटवून आजूबाजूच्या भिंतीकडे पाहणे, घाम फुटणे किंवा घाबरून मान खाली घालून बसणाराही प्रेक्षक वर्ग होता. पडद्यावरच्या जगात हरवून, हरखून जाण्याचे ते दिवस होते.
परंतु आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल काळातले चित्रपट रसिक आदित्य सरपोतदार दिग्दर्शित ‘मुंजा’ मस्त एन्जॉय करत आहेत. याची कारणे अनेक आहेत. फार पूर्वी म्हणजे साठच्या दशकापर्यंत भुताची गोष्ट कृष्णधवल चित्रपटात पाहायला मिळत असे. त्यात काळोखात भूत असे वा तशी हूल असे. ‘महल’, ‘बीस साल बाद’, ‘वह कौन थी’, ‘कोहरा’ वगैरेमध्ये जमेची बाजू असे संगीत. ‘जो हमने दास्तां अपनी सुनाई आप क्यूं रोये…’ वा ‘लग जा गले के फिरसे…’ असो अत्यंत श्रवणीय गाणी होती. कधीही ऐकावीत. सत्तरच्या दशकात एकीकडे अशी भुते चित्रपटातून पडद्यावर येत असतानाच रामसे ब्रदर्सनी अक्राळविक्राळ मुखवटे घेऊन पोस्टरपासून पडद्यापर्यंत भुते आणण्याचे पेटंट घेतले. ‘दो गज जमीन के नीचे’ चक्क यशस्वी ठरला आणि या सात रामसे बंधूंच्या भूत फॅक्टरीत ‘दरवाजा’, ‘पुरानी हवेली’, ‘सामरी’ वगैरे भूतपटांचा चक्क स्वतंत्र प्रेक्षक वर्ग निर्माण केला. कालांतराने विक्रम भट्ट (‘राज’), रामगोपाल वर्मा (‘भूत’, ‘रात’) यांनी संकलन व साऊंड इफेक्ट यांचा उत्तम वापर करीत प्रेक्षकांना घाबरवण्यात यश प्राप्त केले.
तोपर्यंत मनोरंजन वाहिन्यांवर भुतांचा वावर वाढला, ओटीटीवर दक्षिणेकडील भूतपट हिंदीत डब होऊ लागले. भुताचा मनसोक्त वावर असलेल्या इंग्लिश वेब सीरिज पाहता येऊ लागल्या आणि ते उत्तम मनोरंजन वाटू लागले. अति परिचयामुळे भुते जवळ आल्यासारखे झाले आणि आता भूतपटांना ‘भयपट’ कमी, मनोरंजन जास्त अशा स्वरूपात पडद्यावर आणले जाऊ लागले. त्यात खान हिरोच असायला हवा असे नाही. फार बजेटही नको. गीत, संगीत असले तर ठीक, अन्यथा पार्श्वसंगीताचा भरपूर वापर, पूर्वप्रसिद्धीही आवश्यक तेवढीच, पण स्पेशल इफेक्ट्स वारेमाप हवा. कधीकाळी तांत्रिक बाबतीत मागे पडणारा आपला चित्रपट आज त्यात बराच पुढे आहे.
अशा एकूणच बदलत्या वातावरणात भूतपट एन्जॉय केले जात आहेत. अमर कौशिक दिग्दर्शित ‘स्त्राr’ (प्रमुख भूमिकेत राजकुमार राव, श्रद्धा कपूर) या चित्रपटाचा पुढचा भाग अर्थात सिक्वेल ‘स्त्राr 2’ येतोय. ( यात राजकुमार राव व श्रद्धा कपूरच्या जोडीसोबत तमन्ना भाटिया). विकास बहेल दिग्दर्शित ‘शैतान’ (प्रमुख भूमिकेत अजय देवगन, ज्योतिका व आर. माधवन), अमर कौशिक दिग्दर्शित ‘भेडिया’ (वरुण धवन, क्रिती सनोन, दीपक डोब्रियल), हार्दिक मेहता दिग्दर्शित ‘रुही’ (राजकुमार राव, जान्हवी कपूर, वरुण शर्मा) आणि मग आला फर्स्ट शोपासूनच हाऊसफुल्ल गर्दीत एन्जॉय होत असलेला ‘मुंजा!’ योगेश चांदेकर व नीरेन भट्ट लिखित हा चित्रपट कोकणातील एका दंतकथेवर आधारित असून कोणी त्याला ब्रह्मराक्षसाची गोष्टही म्हणतो. अतृप्त मृतात्मा अमावास्येच्या रात्री फिरतो असे त्याचे सूत्र. ‘कांतारा’ पाहून आदित्य सरपोतदारला वाटले, आपल्याकडेही अशा अनेक गोष्टी वर्षानुवर्षे प्रचलित आहेत. त्यातीलच एक चित्रपट माध्यमाचा वापर करीत पडद्यावर आणावी. ती त्याने आणली आणि त्यात प्रेक्षक रमला, रंगला. यशस्वी चित्रपटासाठी आणखी हवे तरी काय? या यशाने शर्वरी वाघ स्टार झाली. तीही कोकणातली. त्यामुळे तिने या चित्रपटाचे शूटिंग एन्जॉय केले. यश मिळाल्यानंतरही ती आजच्यासारखंच मराठीत बोलेल, ऐकेल, सांगेल अशी अपेक्षा. चित्रपटात अभय वर्मा, मोना सिंग, सुहास जोशी, रसिका वेंगुर्लेकर, भाग्यश्री लिमये, अजय पुरकर यांच्याही भूमिका आहेत.
‘मुंजा’च्या यशानंतर गावागावांतील भुताच्या गोष्टींवर चित्रपट निर्मिती वाढणार की अनेक प्रकारच्या प्रचलित पारंपरिक दंतकथांकडे चित्रपट निर्माते, पटकथाकार व दिग्दर्शक वळणार हेच आता पाहायचे आहे. चित्रपटाच्या जगात यश हेच चलनी नाणे असल्याने ज्या प्रकारचा चित्रपट सुपरहिट होतो त्याच मार्गावरून आपण जायचे हे तर स्वाभाविकच, पण त्या चित्रपटांनी भुते घाबरू नयेत इतकेच! अन्यथा तो
‘अॅण्टिक्लायमॅक्स’ ठरेल.
– [email protected]
(लेखक सिनेपत्रकार व समीक्षक आहेत)