गीताबोध : माझी भूमिका

>> गुरुनाथ तेंडुलकर

मागील लेखात आपण श्रीमदभगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायातील शेवटच्या म्हणजे सत्तेचाळिसाव्या श्लोकापर्यंत वाटचाल केली. माझ्या कुवतीनुसार मी प्रत्येक श्लोकाचा अर्थ आणि संदर्भ सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तसं पाहिलं तर भगवद्गीतेचा नेमका अर्थ केवळ भगवान श्रीकृष्णच सांगू शकतात. अन्य कुणीही नाही. ज्यांनी या ग्रंथाचं लेखन केलं त्या व्यास मुनींनादेखील भगवद्गीता पूर्णपणे आकळली नव्हती. भगवद्गीतेवर ज्ञानेश्वरीच्या रूपाने महाभाष्य करून ती मराठीत आणणाऱ्या श्री ज्ञानेश्वर माऊलींनादेखील भगवद्गीता पूर्ण उमगली नव्हती असा उल्लेख त्यांनी स्वतःच केला आहे. अठराव्या अध्यायातील ओवी क्रमांक 1709 मध्ये म्हणतात…

व्यासादिकांचे उन्मेख । राहाटती जेथ साशंक ।
तेथ मीही रंक येक । वाचाळी करी ।।

भावार्थ : व्यासांसारख्या महामती महामुनींची प्रज्ञा, प्रतिभा जिथे चाचपडत राहिली, ज्या विषयाचे व्यासांनादेखील पूर्ण आकलन झालं नाही, तिथे माझ्यासारखा एक सामान्य बुद्धीचा माणूस वाचाळपणे बडबड करतोय. हे कोण म्हणताहेत, तर साक्षात ईश्वरी ज्ञानसंपन्न ज्ञानेश्वर महाराज. मग माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाने भगवद्गीतेवर भाष्य करणं योग्य होणार नाही याची पूर्ण जाणीव असूनदेखील हे शिवधनुष्य उचलण्याचं मी धाडस करतोय. भगवद्गीतेवर अनेक थोर थोर लेखकांनी आणि विचारवंत तत्त्वचिंतकांनी आपापल्या योग्यतेनुसार टीकाटिपणी केली आहे. त्या त्या काळातील सामाजिक गरजेनुसार भाष्य केलं आहे. सगळ्यांची यादी देणं इथं शक्य होणार नाही. पण थोडक्यात सांगायचं तर माऊलींची ‘ज्ञानेश्वरी’ आहेच. तसंच समर्थ रामदासांच्या ‘दासबोध’ ग्रंथालादेखील भगवद्गीतेचाच आधार आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये मंडालेच्या तुरुंगात लोकमान्य टिळकांनी भगवद्गीतेवर लिहिलेल्या ‘गीतारहस्य’ ग्रंथाला ते ‘कर्मयोगशास्त्र’ म्हणतात, तर त्यांच्याच समकालीन पंडित श्रीपाद दामोदर सातावळेकर यांनी लिहिलेल्या ग्रंथाचा उल्लेख पंडितजी ‘पुरुषार्थबोधिनी’ असा करतात. ओशोंनी तर भगवद्गीतेवर अनेक प्रवचनं दिलेली आहेत.

स्वामी चिन्मयानंदांपासून ते स्वामी प्रभुपादांपर्यंत अनेक बुद्धिमंतांनी भगवद्गीतेवर भाष्य केलं आहे. न्यायमूर्ती राम केशव रानडे यांनी त्यांच्या पत्नीला लिहिलेल्या पत्रांतून भगवद्गीता सोप्या शब्दांत समजावून सांगितली आणि त्यातून ‘गीतेच्या गाभाऱयात’ हे पुस्तक जन्माला आलं. गुरुदेव शंकर अभ्यंकर यांनी लिहिलेला ‘गीतासागर’ हा ग्रंथदेखील अभ्यासपूर्ण आहे.
विनोबांनी लिहिलेल्या साध्यासोप्या समश्लोकी ‘गीताई’पासून ते स्वामी रामसुखदासांनी लिहिलेल्या ‘साधक संजीवनी’ ग्रंथापर्यंत अनेक ग्रंथ उपलब्ध असताना माझ्यासारख्या सामान्य कुवतीच्या माणसाने भगवद्गीतेवर भाष्य करण्याचं कारणच ते काय? असा प्रश्न मला स्वतःलादेखील पडला होता, पण त्या प्रश्नाचं उत्तर ज्ञानेश्वरी वाचताना मला सापडलं.

पांख फुटे पाखिरूं । नुडे तरी नभीच थिरु ।
गगन आक्रमी सत्वरू । तो गरुडही तेथ ।।
राजहंसाचे चालणे । भूतळी जालिया शहाणे ।
आणिक काय कोणे । चालावेचिना ।।
जी समुद्राचेनि पैसे । समुद्री आकाश आभासे ।
थिल्लरी थिल्लराऐसे । बिंबेचि पै ।।

भावार्थ : नुकतीच पिसं फुटलल्या छोटय़ा पाखराला आकाशात नीट उडता येत नाही, गरुडासारखी भरारी मारता येत नाही म्हणून त्याने नुसतं हवेत तरंगू नये असं तर नाही ना? राजहंसाची चाल अत्यंत डौलदार असते हे मान्य, पण म्हणून इतरांनी त्यांना जमेल तसं चाललं तरी काही हरकत नसते. समुद्राच्या विस्तीर्ण पृष्ठभागावर त्याच्या विस्ताराएवढं आकाशाचं प्रतिबिंब पडतं, तर सामान्य डबक्यात त्याच्या आकारमानाएवढं तेच आकाश सामावलेलं असतंच की!
आणि बापु पुढां जाये । ते घेत पाउलाची सोये ।
बाळ ये तरी न लाहे । पावों कायी ।।

भावार्थ : बाप पुढे चालला आहे आणि मुलगा जर त्याच्या पावलांचा मागोवा घेत घेत चालत राहिला तर बाप जिथे पोचला तिथे पोचणार नाही का? ज्ञानेश्वर माऊलींच्या या ओव्यांनी मला विलक्षण मानसिक बळ दिलं आणि म्हणूनच मी भगवद्गीतेवर इतरांनी लिहिलेले ग्रंथ आणि उपलब्ध प्रवचनं वाचून ऐकून माझ्या कुवतीनुसार भाष्य करण्यास धजावू शकलो. असो. पहिल्या अध्यायात आपण अर्जुनाची मानसिक संभ्रमावस्था पाहिली. आज संपूर्ण जगातील मानवजात थोडय़ाफार फरकाने अर्जुनासारखीच संभ्रमित झालेली आहे. अर्जुनाचा संभ्रम स्पष्टपणे जाणवत होता. मानसिक संभ्रमाची आठही प्रमुख लक्षणं अर्जुनाच्या ठायी दिसत होती. अर्जुनाची अवस्था आपण पुन्हा एकदा जाणून घेऊ या. तो म्हणतो की,

‘मम गात्राणि सीदन्ति’— माझी गात्रं शिथील झाली आहेत.
‘मुखम् परिशुष्यति’ — घशाला कोरड पडली आहे.
‘शरीरे वेपथुः’ — शरीराला कंप सुटला आहे.
‘रोमहर्ष जायते’ —- अंगावर रोमांच उभे राहिले आहेत.
‘गांडिवं स्त्रसंते हस्तात’ — हातातील धनुष्य गळून पडत आहे.
‘त्वक एव परिदह्यते‘ — त्वचेचाही दाह होत आहे.
‘न शक्नोपि अवस्थातुम्’ — मला धड उभंदेखील राहता येत नाही.
‘भ्रमति इव मे मनः’ — माझं मन भ्रमिष्ट झालं आहे.

नैराश्याग्रस्त मनोरुग्ण झाल्याची ही सर्व बाह्यात्कारी लक्षणं अर्जुनाच्या ठायी आढळली. सुदैवाने त्याला स्वतःला ती जाणवली. त्याने भगवान श्रीकृष्णाला ती सांगितल्यानंतर भगवंतांनी टप्प्याटप्प्याने अर्जुनाच्या भेदरलेल्या-भरकटलेल्या मनावर उपचार केले आणि त्याला पुन्हा योग्य मार्गावर आणले. त्याचा गेलेला आत्मविश्वास त्याला पुन्हा मिळवून दिला.

आज आपल्यापैकी बहुसंख्य लोक कोणत्या ना कोणत्या तरी नैराश्याने ग्रासलेले आहेत. आत्मविश्वास गमावून बसले आहेत. बाहेरच्या जगातील वातावरण त्यात अधिकच भर घालत आहे. दररोजच्या वर्तमानपत्रांतून येणाऱया निराशाजनक बातम्यांपासून ते टीव्हीवरच्या भडक आणि अतिरंजित सीरियलपर्यंत सगळंच वातावरण सामान्य माणसाला अधिकाधिक वेडं करण्यासाठी टपून बसलेलं आहे. उदाहणच द्यायचं झालं तर ज्यांचा आदर्श लोकांनी डोळ्यांसमोर ठेवावा असे कलावंत, खेळाडू ऑनलाइन रमीसारख्या जुगाराच्या जाहिराती करताहेत. दारू प्या, तंबाखू, गुटखा खा, असं प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सांगताहेत. भडक मालिकांतून व्यभिचाराचं उघडंनागडं सादरीकरण केलं जातंय. सिनेमा, नाटकांतून सनातन धर्माची आणि हिंदुस्थानी सभ्यता-संस्कृतीची टिंगलटवाळी केली जातेय. आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींच्या वर्तनापासून ते गल्लीतल्या गावगुंड राजकारण्यांपर्यंत… सगळीकडे निराशाजनक वातावरण आहे. याचा परिणाम म्हणजे आपण सगळेच थोडय़ाफार फरकाने अर्जुन झालो आहोत. अर्जुनाच्या नैराश्याची लक्षणं निदान स्पष्ट दिसत तरी होती. त्याला स्वतःला जाणवत होती. दुर्दैवाने आपल्या नैराश्याची आणि संमूढ मनोवस्थेची लक्षणं आपल्याला स्वतःलाही धडपणे दिसत नाहीत, स्पष्टपणे जाणवत नाहीत.

या सगळ्याचा परिणाम आरोग्यावर होतोच होतो. प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष तक्ररी सुरू होतात. रात्री शांत झोप लागत नाही. आसिडिटीचा त्रास होतो, करपट ढेकर येतात. अधूनमधून डोकं ठणकतं. पोट साफ होत नाही, भूक लागत नाही. साधं, सात्त्विक जेवण नकोसं वाटतं. चमचमीत, चटकदार पदार्थाची चटक लागते. घरातल्या जेवणापेक्षा हॉटेलच्या जेवणाला अधिक प्राधान्य दिलं जातं. समाजात वागताना वावरताना छोटय़ा छोटय़ा कारणाने चिडचिड होते. एकाच घरात राहणारी माणसं संवाद हरवून स्वमग्न बनतात.

स्त्रियांच्या बाबतीत तर अनेक तक्रारी जाणवतात. मासिक पाळीतील अनियमिततेपासून ते सततच्या कंबरदुखीपर्यंत. चाळिशी उलटण्याच्या आतच गुडघे दुखू लागतात. वजनवाढीची समस्या आणि त्यातून निर्माण होणाऱया डायबिटीस, हाय ब्लड प्रेशरसारख्या अनेक तक्रारी. कोणत्याही कामात उत्साह वाटत नाही. जीवनाकडे बघताना एक उदासीन-हताश भावना मनात दाटून येते. त्यावर उपाय म्हणून माणसं निरनिराळी व्यसनं जवळ करतात. वरकरणी अगदी साधी आणि निरुपद्रवी वाटणारी ही व्यसनं आयुष्याला विळखा घालतात. एखाद्या बुवा-बापूच्या नादाला लागून कामाकडे केलेलं दुर्लक्ष असो किंवा तंबाखू, सिगारेट, दारूसारखी आरोग्याचा घात आणि पैशांचा नाश करणारी व्यसनं असोत. अगदी व्हॉटसआपवरचे मेसेज इकडून तिकडे पाठवणं असो किंवा फेसबुकवर तासन्तास मारलेला फेरफटका असो. स्वतः कोणत्याही प्रकारचा शारीरिक व्यायाम न करता बारमाही चालणाऱ्या क्रिकेटच्या मॅच बघणं असो किंवा ओटीटीवरच्या चटकदार वेब सीरिज बघण्यासाठी केलेली जागरणं असोत, त्याचा विपरीत परिणाम शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होतोच होतो.

आपण अर्जुनासारखे भरकटतो. आपलं नेमकं कर्तव्य न करता भलत्याच मार्गाला जातो. सुंदर आयुष्याचं नुकसान करून घेतो. या सगळ्यावर वैद्यकीय उपचारांच्या जोडीनं एक आध्यात्मिक उपचार करायला काय हरकत आहे? भ्रमिष्ट अर्जुनाला मार्गदर्शन करणाऱ्या भगवान श्रीकृष्णाला शरण जाऊन त्याने दाखवलेल्या मार्गावरून प्रवास केला तर…?
मला स्वतःला माझ्यातला अर्जुन जाणवला आणि त्यानंतर मी माझ्यातलाच श्रीकृष्ण शोधून त्याला शरण गेलो.
माझ्यातील श्रीकृष्ण मला जे जे सांगतो, ते ते मी या लेखमालिकेतून शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न करतोय. हीच माझी या लेखमालिकेमागची भूमिका.
।। श्री कृष्णार्पणमस्तु ।।

[email protected]