विधान परिषद शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या मतदाना दिवशीच ठाणे, रायगडमध्ये दारुबंदी असेल, असे अंतरिम आदेश शुक्रवारी उच्च न्यायालयाने दिले. 25 जून 2024 रोजी रात्री 12 वाजल्यापासून 26 जूनला मतदान होईपर्यंत ड्राय डे असेल, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
ठाणे व रायगड जिल्हाधिकारी यांनी ड्राय डेचे आदेश काढले होते. 24 जून 2024 रोजी सायंकाळी सहा वाजल्यापासून 26 जूनला मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत दारुबंदीचे फर्मान जारी करण्यात आले होते. त्याविरोधात नवी मुंबई हॉटेल ओनर्स असोसिएशनने अॅड. सुजय गावडे व अॅड. मुदिता पवार यांच्या मार्फत दोन स्वतंत्र याचिका दाखल केल्या होत्या. मतदान होईपर्यंतच दारुबंदी असावी, अशी मागणी या याचिकांमध्ये करण्यात आली होती. अॅड. आर. डी. सोनी यांनी याचिकाकर्त्यांकडून युक्तिवाद केला. न्या. बी. पी. कुलाबावाला व न्या. फिरदोश न्नीवाला यांच्या खंडपीठासमोर या याचिकांवर एकत्रित सुनावणी झाली. न्यायालयाने याचिकाकर्त्यांची मागणी मान्य करत जिल्हाधिकाऱयांचे मूळ फर्मान रद्द करत वरील आदेश दिले.
न्यायालयाचे निरीक्षण
विधान परिषद निवडणुकीला दारुबंदी करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना आहेत की नाही याचा निर्णय अजून झालेला नाही. विधान परिषद निवडणुकीला मतदानाच्या दिवशी ड्राय डे असावा, असे अंतरिम आदेश उच्च न्यायालयाने याआधीही दिले आहेत. या याचिकेतदेखील अशाच प्रकारचे अंतरिम आदेश दिले जात आहेत, असे खंडपीठाने स्पष्ट केले.
असोसिएशनचा युक्तिवाद
लोकसभा व विधानसभा निवडणुकीला ड्राय डे जाहीर करण्याची तरतूद आहे. विधान परिषद निवडणुकीला दारुबंदी लागू करता येणार नाही. याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल आहेत. तरीही जिल्हाधिकारी यांनी दोन दिवसांचा ड्राय डे जाहीर केला आहे, असा युक्तिवाद अॅड. सोनी यांनी केला.
केंद्रीय निवडणूक आयोग प्रतिवादी
या याचिकांमध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाला प्रतिवादी करावे. कारण त्यांच्या निर्देशानुसारच जिल्हाधिकारी यांनी ड्राय डे जाहीर केला आहे, असा युक्तिवाद सरकारी वकील आसिफ पटेल यांनी केला. त्याची नोंद करून घेत या याचिकेत केंद्र निवडणूक आयोगाला प्रतिवादी करण्याचे आदेश न्यायालयाने याचिकाकर्त्यांना दिले. यावरील पुढील सुनावणी 21 जुलै 2024 रोजी होणार आहे.