मुंबईत अजूनही नाल्यांची साफसफाई बोंबललेलीच; तक्रारीनंतर वडाळय़ातील ट्रक टर्मिनस येथील नाल्याची सफाई सुरू

पाऊस सुरू झाला तरी मुंबईतील अनेक नाल्यांची साफसफाई अजूनही झाली नसल्याचे वास्तव समोर येत आहे. पालिकेतील माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी गुरुवारी वडाळ्यातील कोकरे नाल्याची पाहणी केली आणि साचलेल्या गाळाचे फोटो व्हायरल करून मुंबई महापालिकेच्या नालेसफाईची पोलखोल केली होती. त्यानंतर आज वडाळा ट्रक टर्मिनस येथील म्हाडाच्या न्यू ट्रान्झिट कॅम्पमधील नाल्यात साचलेला गाळ व तरंगता कचरा काढण्याची कार्यवाही आज महापालिकेने तातडीने सुरू केली.

मुंबईत पावसाळ्यापूर्वी पालिकेकडून नालेसफाई केली जाते. नालेसफाई 100 टक्के केल्याचा दावा गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षीही पालिकेने केला होता. मात्र प्रत्यक्षात अनेक छोटे-मोठे नाले गाळ आणि तरंगत्या कचऱयाने भरलेले आढळले. मुंबईत पर्जन्य जलवाहिन्या विभागाच्यावतीने मोठय़ा नाल्यातील तर विभाग कार्यालयांकडून लहान नाल्यातून गाळ आणि तरंगता कचरा काढला जातो. मुंबईतील पर्जन्यमान आणि पावसाची तीव्रता हा अनुभव लक्षात घेऊन नाल्यांमधून किती गाळ काढणे आवश्यक आहे, याचा अभ्यास करून गाळ उपशाचे उद्दिष्ट दरवर्षी निश्चित केले जाते. त्यानुसार वार्षिक उद्दिष्टापैकी पावसाळ्यापूर्वी म्हणजे 31 मेपर्यंत मोठय़ा नाल्यातील 75 टक्के गाळ काढण्याचे उद्दिष्ट होते. या उद्दिष्टानुरूप 31 मे 2024पर्यंत विविध नाल्यांमधून 10 लाख 22 हजार 131 दशलक्ष टन इतका गाळ काढण्यात आला आहे. पावसाळ्या दरम्यान म्हणजे 1 जूनपासून नाल्यांमधून 15 टक्के काढण्याचे उद्दिष्ट आहे. त्यानुसार 1 जून ते 21 जून दरम्यान विविध नाल्यातून एकूण 1 लाख 15 हजार 473 दशलक्ष टन इतका गाळ काढण्यात आलेला आहे. तर पावसाळ्यानंतर उर्वरित 10 टक्के गाळ काढण्याचे उद्दिष्ट आहे.

कचरा नाल्यात टाकू नका!
छोटय़ा-मोठय़ा नाल्यांमध्ये गाळाबरोबर मोठय़ा प्रमाणात तरंगता असतो. स्थानिकांकडून हा कचरा टाकला जातो. पावसाळ्यात अतिवृष्टी झाली तर या कचऱयामुळे नाले तुंबतात आणि त्याचा स्थानिकांसह आजूबाजूच्या रहिवाशांनाही त्रास होतो. त्याचबरोबर काही वेळा घर आणि इमारतीचे साहित्य, राडारोडाही स्थानिक नाल्यात टाकतात. त्यामुळे पावसाळ्यात नाल्यांमधील पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होतो. त्यामुळे रहिवाशांनी कचरा, राडारोडा नाल्यात टाकू नये, असे आवाहन पालिकेने मुंबईकरांना केले आहे.