1 लाख 61 हजार विद्यार्थ्यांची आयटीआयला पसंती; प्रवेशअर्ज करण्यासाठी 30 जूनपर्यंत मुदत

राज्यातील शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) प्रवेशाला विद्यार्थ्यांची पसंती मिळत असून आतापर्यंत 1 लाख 60 हजार 321 विद्यार्थ्यांनी ऑनलाइन प्रवेशअर्ज भरले आहेत. एकूण 1 लाख 72 हजार 617 विद्यार्थ्यांनी आयटीआय प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. तर 1 लाख 58 हजार 327 विद्यार्थ्यांनी शुल्क भरले आहे.

आयटीआयच्या ऑगस्ट 2024 मधील सत्रासाठी ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया 3 जूनपासून सुरू झाली आहे. दहावी, बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने प्रवेशअर्ज भरता येणार असून ही प्रक्रिया 30 जूनपर्यंत सुरू राहणार आहे. आयटीआय प्रवेशाची प्राथमिक गुणवत्ता यादी 4 जुलैला सकाळी 11 वाजता प्रसिद्ध केली जाईल. या यादीबाबत विद्यार्थ्यांना हरकती नोंदविण्यासाठी मुदत दिली जाणार असून त्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे.

विद्यार्थ्यांना प्रवेशप्रक्रियेविषयी मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक शासकीय आणि खासगी संस्थामध्ये दररोज सकाळी 10 ते 11 या कालावधीत मोफत मार्गदर्शन सत्र सुरू आहेत.

प्रवेशाबाबत किंवा अन्य शंका असल्यास आयटीआय प्रवेशाच्या वेबसाईटवर असलेल्या दूरध्वनी क्रमांकावर सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत संपर्क साधण्याचे आवाहन व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दि.अं. दळवी यांनी केले आहे.

प्रवेशाची वेबसाईट – http://admission.dvet.gov.in

एकूण आयआयटी संस्था

418 शासकीय, 574 खासगी

उपलब्ध जागा

एकूण 1 लाख 48 हजार 568

शासकीय आयटीआय 80 हून अधिक ट्रेड, 92 हजार 264 जागा

खासगी आयटीआय 56 हजार 204 जागा

अर्जाची स्थिती

प्रवेश नोंदणी …………. 172617

प्रवेशअर्ज भरले……….. 160321

प्रवेश शुल्क भरले……… 158327

आयटीआय कन्फर्म…….  94,706

पसंतीक्रम अर्ज भरला…… 82,055