विक्रोळी विधानसभा मतदारसंघातील पावसाळ्यापूर्वीच्या अपूर्ण राहिलेल्या कामांवरून आमदार सुनील राऊत यांनी पालिका अधिकाऱ्यांना धारेवर धरले. मान्सूनपूर्व कामे तातडीने पूर्ण करा, अशी सूचना शिवसेनेचे आमदार सुनील राऊत यांनी पालिका अधिकाऱ्यांना केली.
विक्रोळी विधानसभेतील विविध समस्यांबद्दल घेण्यात आलेल्या मान्सूनपूर्व आढावा बैठकीत सुनील राऊत यांनी पालिका प्रशासनाचे कान उपटले. यावेळी पालिका उपायुक्त, परिमंडळ 6 आणि एल विभागाचे साहाय्यक आयुक्तही उपस्थित होते. बैठकीला माजी महापौर दत्ता दळवी, माजी नगरसेविका राजराजेश्वरी रेडकर, रश्मी पहुडकर, शेखर जाधव, परम यादव, निलेश साळुंखे, शाखाप्रमुख दीपक सावंत, अभय राणे, सचिन मदने, सचिन चोरमुळे उपस्थित होते.
फक्त 20 टक्केच नालेसफाई
विक्रोळीतील फक्त 20 टक्केच नालेसफाई झाली आहे. कन्नमवारनगर येथील नाला (सीआरझेड), ट्रान्समिशन नाला, हरियाली नाला, मशीद नाला आदी नाल्यांचीही साफसफाई झाली नसल्याची छायाचित्रे सुनील राऊत यांनी बैठकीत दाखवली. त्यावर दोन दिवसांत नालेसफाई करू, असे आश्वासन पालिका अधिकाऱ्यांनी दिले.
आजार पसरल्यावर कचरा उचलणार का?
विक्रोळीत अनेक ठिकाणी मोठय़ा प्रमाणात कचरा साचलेला आहे, डेब्रिज पडलेले आहे. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली असून माशा आणि डास यांचा प्रादुर्भाव वाढला आहे. याबाबत कारवाई करा, अशी सूचना सुनील राऊत यांनी केली असता कचरा उचलणाऱया गाडय़ांची कमतरता असल्याचे अधिकाऱयाने सांगितले. साथीचे आजार पसरेपर्यंत कचरा उचलणार नाही का, असा सवाल राऊत यांनी केला. त्यावर एका दिवसांत कचरा उचलू, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.
संरक्षक भिंत बांधा
विक्रोळीतील एलबीएस मार्गावरील मेट्रो लाईनमुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत ते तातडीने बुजवा. सूर्यानगर झोपडपट्टी ही डोंगराखाली असून दरवर्षी पावसाळ्यात दरड कोसळून दुर्घटना होण्याचा धोका असतो. त्यामुळे या ठिकाणी दरडींपासून लोकांचे संरक्षण होईल, अशी मजबूत संरक्षक भिंत बांधा, अशी मागणी राऊत यांनी केली.
विकासकाने नाला बुजवला
दत्तक योजनेचे तीन तेरा वाजले असून या योजनेवर नेमलेल्या कंत्राटदारावर कारवाई करा, कांजूर मेट्रो शेडच्या जागेतून जाणाऱया नाल्यात आजमेरा विकासकाने राडारोडा टाकून हा नाला बुजवला. हा भराव टाकणाऱया विकासकावर कारवाईची मागणी राऊत यांनी केली.