कल्याणीनगर हीट अँण्ड रन प्रकरणी अल्पवयीन मुलाला कार चालवायला दिल्या प्रकरणी विशाल अगरवाल याचा जामीन अर्ज न्यायालयाने मंजूर केला आहे. विशाल याला जामीन मंजूर झाला असला तरी चालकाला धमकावणे, अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलून पुरावा नष्ट केल्या प्रकरणी दाखल गुह्यात तो न्यायालयीन कोठडीत आहे.
कल्याणीनगर भागात अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत पोर्शे कार भरधाव वेगाने चालवून दुचाकीला धडक दिली होती. या अपघातात दुचाकीवरील तरुण-तरुणीचा मृत्यू झाला होता. अल्पवयीन मुलाकडे वाहन चालवण्याचा परवाना नसताना त्याला कार चालवायला दिल्या प्रकरणी विशाल अगरवाल याला अटक करण्यात आली होती. विशालसह पबमध्ये या अल्पवयीन मुलासह त्याच्या मित्रांना दारू दिल्या प्रकरणी पबमालकासह कर्मचाऱ्यांनादेखील अटक केली होती.
या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यानंतर त्यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील विद्या विभुते यांनी युक्तिवाद केला. तर बचाव पक्षातर्फे ऍड. एस.के. जैन, ऍड. सुधीर शहा, ऍड. अमोल डांगे, ऍड. प्रशांत पाटील यांनी युक्तिवाद केला. दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेत न्यायालयाने जामीन अर्ज मंजूर केला.