मुसळधार पाऊस, सोसाटय़ाचा वारा; ठाण्यात इमारतीचे लोखंडी छत मैदानात कोसळून 7 विद्यार्थी जखमी

उपवन जवळील गावंडबाग परिसरात असलेल्या टर्फ क्लबच्या मैदानावर काही मुले फुटबॉल खेळत असता तुफान पाऊस आणि सोसाटय़ाच्या वाऱयामुळे शेजारच्या इमारतीवरील महाकाय लोखंडी छत अक्षरशः उखडले आणि मैदानावर कोसळले. या घटनेत सात मुले गंभीर जखमी झाली. त्यांना तातडीने जवळच असलेल्या बेतनी रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना आज सायंकाळी उशिरा घडली.

आज सायंकाळी ठाण्यात सोसाटय़ाच्या वाऱयासह मुसळधार पाऊस सुरू झाला. वाऱयाचा जोर इतका होता की, उपवन परिसरातील गावंड बाग येथील रौनक पार्क या इमारतीची लोखंडी शेड अक्षरशः उखडली आणि उडून फुटबॉल टर्फवर कोसळली. लोखंडी शेड अंगावर कोसळल्याने तेथे खेळणारी  7 मुले जखमी झाली. हे सर्व विद्यार्थी नववी आणि दहावीच्या वर्गात शिकत आहेत. अभिज्ञान, आर्यन, आयुष, एथन, अयान, सिद्धार्थ अशी जखमी  विद्यार्थ्यांची नावे आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

भिंत कोसळून एक जण जखमी

मुसळधार पावसाचा फटका वर्तकनगरच्या वेदांत कॉम्प्लेक्स येथेही बसला.  या परिसरात  भिंत कोसळून एक जण जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या व्यक्तीच्या हाताला दुखापत झाली आहे.